देशांतील विविध राज्यांमध्ये वाढत असलेल्या कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आज (13 जानेवारी) एक बैठक घेऊन चर्चा केली. व्हिडिओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीला विविध राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. मात्र, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) प्रकृती अस्वास्थ्यामुळे या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे या बैठकीत महाराष्ट्राच्या वतीने राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सहभाग घेतला. दरम्यान, या बैठकीत राजेश टोपे यांना बोलण्याची संधीच मिळाली नाही. त्यामुळे राज्यात आता चर्चेला विषय मिळाला आहे.
विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आपापल्या राज्यांमध्ये असलेला कोरोना प्रादुर्भाव, त्यावरील उपाययोजना आणि केंद्र सरकारकडून अपेक्षीत असलेली मदत आणि सहकार्य यांबाबत माहिती दिली. विविध मुद्द्यांवर भूमिकाही मांडली. काही मुख्यमंत्र्यांनी विविध मागण्याही पंतप्रधानांसमोर ठेवल्या. दरम्यान, राजेश टोपे यांना मात्र महाराष्ट्राच्या वतीने आपल्या मागण्या या ठिकाणी ठेवता आल्या नाहीत. पंतप्रधानांच्या बैठकीत केवळ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाच बोलण्याची परवानगी देण्यात आल्याने टोपे यांना आपले मुद्दे प्रत्यक्षात मांडता आले नाहीत. पंतप्रधानांकडूनच तसा नियम करण्यात आल्याने आरोग्यमंत्र्यांची भलतीच अडचण झाली. अखेर त्यांना आपले मुद्दे लिखीत स्वरुपात मांडावे लागले. (हेही वाचा, Coronavirus: राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या सव्वादोन लाखांच्याही वर, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले हे अवाहन)
आरोग्यमंत्री टोपे यांनीच पंतप्रधानांच्या बैठकीतील तपशील प्रसारमाध्यमांना सांगितला. राजेश टोपे म्हणाले, मुख्यमंत्र्यांशीवाय इतर कोणालाही त्या बैठकीत बोलण्याची परवानगी नव्हती. आम्ही त्यांना बोलू देण्याबबत विनंती केली. मात्र, त्यांनी ती मान्य केली नाही. त्यांनी तसे ठरवलेच असल्याने आम्हाला आमच्या मागण्या प्रत्यक्षात मांडता आल्या नाहीत. त्यामुळे शेवटी मग आम्ही आमच्या मागण्या लेखी स्वरुपात मांडल्याचे टोपे म्हणाले.
पंतप्रधानांसोबतच्या बैठकीतील महाराष्ट्राने केल्या मागण्या
- केंद्राच्या लसीकरणाच्या कार्यक्रमात 40 लाख कोवॅक्सिन आणि 50 लाख कोविशिल्ड लसीचे डोस उपलब्ध करून द्यावेत
- 15 ते 18 आणि 60 पेक्षा जास्त वयोगटासाठी आणि फ्रंटलाईन वर्कर्ससाठी कोवॅक्सिन प्रामुख्याने कमी पडत आहे. त्याची पूर्तता करावी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीसाठी का उपस्थित राहू शकले नाहीत? असे विचारले असता प्रकृतीच्या कारणास्थव ते या बैठकीला हजर राहू शकले नसल्याचे टोपे म्हणाले. तसेच, आपल्या अनुपस्थितीबद्दल पंतप्रधान कार्यालयाला त्यांनी कळवले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने त्यांना दोन ते अडीच तास एकाच जागेवर बसून राहणे प्रकृतीच्या दृष्टीने योग्य नसल्याचा सल्ला डॉक्टरांनी त्यांना दिला आहे. त्यामुळे त्यांनी आजच्या बैठकीला उपस्थित न राहणेच पसंत केल्याचे टोपे म्हणाले.