Rajan Salvi | (Photo Credit: Facebook)

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांचे निकटवर्तीय आणि मातोश्रीचे निष्ठावंत म्हणून ओळख असलेले माजी आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी अखेर उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आज त्यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राजन साळवी शिंदे गटासोबत जाऊन शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. गुरूवार 13 फेब्रुवारी दिवशी राजन साळवी यांचा शिवसेना पक्षामध्ये एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

राजन साळवींनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडणं हा मोठा धक्का आहे. राजन साळवी हे माजी आमदार आहे.विधानसभेत त्यांनी राजापूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व केले आहे. मात्र 2024 मध्ये त्यांचा विधानसभा निवडणूकीत किरण सामंत यांच्याकडून पराभव झाल्यानंतर ते नाराज होते. त्यांचे पक्षात विनायक राऊत यांच्यासोबत वाद होते. उद्धव ठाकरेंनीही विनायक राऊतांना पडती बाजू दिल्याने ते अधिकच दुखावले गेले. अखेर त्यांनी आता उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. नक्की वाचा: Rajan Salvi: मरेपर्यंत शिवसेनेतच राहणार, माझी निष्ठा उद्धव ठाकरे यांच्या पायाशी, आमदर राजन साळवी यांच्याकडून बंडखोरीच्या चर्चेस पुर्णविराम. 

शिवसेनेमध्ये बंड झाल्यानंतर काही मोजकेच आमदार उद्धव ठाकरेंसोबत राहिले होते. त्यांच्यापैकी एक राजन साळवी होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रडार वर असूनही राजन साळवी उद्धव ठाकरेंसोबत राहिले. विधानसभा निवडणुकीत माजी खासदार विनायक राऊत यांनी मदत न केल्यामुळे खट्टू झालेले साळवी मातोश्री वर गेले होते. मात्र त्यांना अपेक्षित साथ न मिळाल्याने ते नाराज होऊन बाहेर पडले होते.

राजन साळवी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर एकनाथ शिंदेंसोबत जाणार की भाजपा मध्ये पक्ष प्रवेश करणार? यावर अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती पण अखेर एकनाथ शिंदेंनी राजन साळवींना आपल्याकडे वळवण्यात यश मिळवले आहे.