Rajan Salvi: मरेपर्यंत शिवसेनेतच राहणार, माझी निष्ठा उद्धव ठाकरे यांच्या पायाशी, आमदर राजन साळवी यांच्याकडून बंडखोरीच्या चर्चेस पुर्णविराम
Rajan Salvi | (Photo Credit: Facebook)

शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत असलेले आमदार राजन साळवी (Rajan Salvi) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार अशी चर्चा पाठिमागच्या एकदोन दिवसापासून मोठ्या प्रमाणावर रंगली होती. राजकीय वर्तुळातील या चर्चेमुळे उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा आणखी एक धक्का बसणार का? अशी चर्चा होती. मात्र, या चर्चेला स्वत: आमदार राजन साळवी यांनीच पूर्णविराम दिला आहे. आपली निष्टा ही उद्धव ठाकरे यांच्या पायाशी आहे. आपण मरेपर्यंत शिवसेनेतच राहणार, असे राजन साळवी यांनी म्हटले आहे. त्यामुळे पाठिमागील दोन दिवसांपासून सुरु असलेला चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

शिवसेना आमदार राजन साळवी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची चर्चा होती. मात्र, आपण अशी कोणाचीही आणि कोणत्याही प्रकारची भेट घेतली नसल्याचे राजन साळवी यांनी म्हटले आहे. आपण आजही उद्धव ठाकरे यांच्याशीच एकनिष्ठ आहोत. मात्र, तरीही आपल्याबद्दल अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जात असल्याबद्दल दु:ख वाटते अशा भावनाही साळवी यांनी व्यक्त केल्या. राजन साळवी हे कोकणातील शिवसेनेचा एक प्रमुख चेहरा आहेत. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे कोकणात उद्धव ठाकरे यांना मोठा फटका बसला आहे. अशा वेळी राजन साळवी हे जर शिंदे गटात गेले तर उद्धव ठाकरे यांच्यासमोरील कोकणातील आव्हान अधिक वाढले असते. (हेही वाचा, Maharashtra Assembly Monsoon Session 2022: 'काळी दाढी, पांढरी दाढी', सत्ताधारी विरोधकांमध्ये टोलेबाजी; छगन भुजबळ, देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणात नर्मविनोदाची पेरणी)

शिवसेनेला मोठा झटका बसल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षांतर्गत अनेक बदल केले. राजन साळवी यांच्याकडे पक्षाचे उपनेते पद आले आहे. यावरुन बोलताना आमदार साळवी म्हणाले. मी पक्षाचा उपनेता आहे. त्यामुळे आता उपनेता म्हणून राज्यभर दौरे काढणार आहे. राज्यभरातील शिवसैनिकांना भेटणार आहे. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मी पहिल्याच दिवशी भाग घेतला. त्यानंतर मी आदित्य ठाकरे यांच्यासोबत दौऱ्यांवर होतो. मी अनेक ठिकाणी जातो आहे. पाहतो आहे ठाकरे कुटुंबीयांना आणि शिवसेनेला भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे. राज्यात शिवसेना भक्कम करण्यासाठी आम्ही जोरदार प्रयत्न करु असेही, राजन साळवी यांनी म्हटले आहे.