Raj Thackeray | (Photo Credit - Twitter)

मुंबई मध्ये शिक्षकांना निवडणूकीच्या कामासाठी जुंपल्यावरून आज शारदाश्रम शाळेच्या शिक्षकांनी शिवतीर्थ वर मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर राज ठाकरेंनी शिक्षकांनी निवडणुकीचं काम करु नयेत. शिस्तभंगाची कारवाई कोण करतंय? हे मी पाहतो असे म्हणत निवडणूक आयोगाला सज्जड दम भरला आहे. शारदाश्रमच्या 1 ली ते 4 थी च्या सर्व शिक्षकांना निवडणूकीची ड्युटी लावण्यात आली आहे. तसेच यासाठी कोणतीही कालमर्यादा देण्यात आली नाही.  दरम्यान मुंबई मध्ये 4136 शिक्षकांना निवडणूकीच्या कामासाठी शाळेपासून दूर केलं आहे. अशाप्रकारे शिक्षकांना दूर केल्यानंतर मुलांचा अभ्यासक्रम कोण पूर्ण करणार? असा सवाल त्यांनी विचारला आहे. तसेच शिक्षकांऐवजी निवडणूक आयोगावरच शिस्तभंगाची कारवाई करावी असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

येत्या काही दिवसांत मनसेचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे. त्यांच्यासमोर हा मुद्दा ठेवणार आहे. तोपर्यंत कोणत्याही शिक्षकाने निवडणूकीच्या कामासाठी रूजू होऊ नये असं म्हटलं आहे. देशात इतकी वर्ष निवडणूक सुरू आहे. 5 वर्ष निवडणूक आयोग काय झोपा काढत होतं? त्यांना कामाची आखणी करता आली नाही का? असा सवाल यावेळी उपस्थित केला आहे.

दरम्यान आज सकाळी राज ठाकरे आणि भाजपाचे आशिष शेलार यांच्यात बैठक झाल्याचं वृत्त आहे. मनसेला महायुतीमध्ये सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. परंतू आज राज ठाकरेंनी त्यावर बोलणं टाळलं आहे. निवडणूका आल्या की त्यावर बोलेन असं म्हणत आज राज ठाकरेंनी एनडीए मध्ये मनसेच्या एन्ट्रीच्या चर्चा बंद केल्या आहेत.

देशात 400 पार आणि महाराष्ट्रात 45 पार चं लोकसभा निवडणूकीसाठी भाजपा चं लक्ष्य आहे. यामध्ये मुंबई मधील सहा जागा महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी भाजपा-मनसे एकत्र येण्याची चर्चा आहे.