पुण्याच्या दौर्यावर असलेल्या राज ठाकरेंनी (Raj Thackeray) आज पत्रकारांशी बोलताना अमित ठाकरे, टोलनाके, इर्शाळवाडी ते विधिमंडळात विरोधीपक्ष नेता नसल्याबाबत भाष्य करताना सरकार सह भाजपावर हल्लाबोल केला आहे. कुणाला केवळ भेटल्याने युत्या-आघाड्या होत नसल्याचं सांगताना राज ठाकरे यांनी एनसीपी बाबत पुन्हा तिच भविष्यवाणी केली आहे.
महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी एनसीपी मध्येही फूट पडून एक गट सत्तेत जाऊन बसला आहे. मात्र त्यानंतर सध्या सुरू असलेल्या पावसळी अधिवेशनामध्ये विरोधकांकडून अद्याप विरोधीपक्ष नेता नेमण्यात आलेला नाही. याबाबत राज ठाकरेंना प्रश्न विचारला असता त्यांनी आपल्या प्रतिक्रियेची पुन्हा आठवण करुन दिली आहे.
अजित पवारांच्या शपथविधी वेळेस राज ठाकरे म्हणाले होते की 'एनसीपीची एक टीम सत्तेत सहभागी झाली आहे लवकरच दुसरी टीम देखील रवाना होईल.' आज त्यांनी विरोधीपक्ष नेता अद्याप का नेमला जात नाही यावर बोलताना आपल्या त्यच विधानाची पुन्हा आठवण करून दिली आहे. विरोधीपक्ष नेता सोडा आधिक विरोधी पक्ष कोणता? हे सांगा असा सवाल विचारला आहे.
एकनाथ शिंदेंनी भाजपासोबत जाऊन सरकार बनवल्यानंतर अजित पवारांची विरोधीपक्ष नेतेपदी निवड झाली होती. आता तेच सत्तेत सहभागी झाल्यानंतर विधानसभेत विरोधीपक्ष नेते पदी सभागृहात कुणाची निवड झालेली नाही. मात्र शरद पवारांनी सध्या त्यांच्याकडून ही जबाबदारी जितेंद्र आव्हाडांकडे दिली आहे. नक्की वाचा: Manse VS BJP: भाजपाने अमित ठाकरेंना लगावला टोला, ट्विटरवर भाजप vs मनसे टोलेबाजी सुरु
अमित ठाकरेंची गाडी रोखल्याच्या प्रकरणानंतर भाजपा अमित ठाकरे आणि मनसे वर तुटून पडले आहेत. त्याला उत्तर देतानाही मनसेने भाजपाला ज्या एनसीपी नेत्यांबद्दल भाजपा आक्रमक झाली होती त्यांच्याशी आता कशी जवळीक साधत आहे यावरून टीका केली आहे.