राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली EVM विरोधात विरोधी पक्षांची एक पत्रकार परिषद मुंबई येथे आज (शुक्रवार,2 ऑगस्ट 2019) पार पडली. या बैठकीत EVM विरोधात राज्यभर जनजागृती करण्यात येईल. तसेच, येत्या 21 ऑगस्ट रोजी EVM विरोधात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येईल. या मोर्चात कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल, अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली.या बैठकीस सत्ताधारी भाजप, शिवसेना वगळता विरोधी पक्षातील प्रमुख नेते उपस्थित होते.
या वेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले,निवडणूक प्रणालीत पारदर्शीपणा आणण्यासाठी आम्ही बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी आम्ही करत आहोत. ही माझी किंवा कोणा एका पक्षाची मागणी नाही. ही सर्व पक्षीयांची मागणी आहे.खरं म्हणजे आजच्या या बैठक आणि पत्रकार परिदेसाठी शिवसेना, भाजप या पक्षांनीही उपस्थित राहायला हवे होते, अशी भावनाही राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
मुंबई येथे पार पडलेल्या या पत्रकार परिषदेस महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, छगन भुजबळ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसेपाटील, आमदार कपील पाटील, कॉम्रेड रेड्डी आणि इतर नेते उपस्थित होते. या वेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात या मागणीसाठी आम्ही एक अर्ज तयार करत आहोत. हा अर्ज घेऊन सर्व पक्षांचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन ते भरुन घेतील. तसेच, याच मागणीसाठी आम्ही येत्या 21 ऑगस्ट रोजी सर्व पक्षीय विराट मोर्चा कारणार आहोत. (हेही वाचा, सूर्य दिसेना, भाजपमध्ये गेला वाटतं? भाजप पक्ष प्रवेशाची सोशल मीडियावर खिल्ली; शहरांमध्येही झळकले बॅनर)
दरम्यान, या वेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, पारदर्शक निवडणूक होण्यासाठी बॅलेट पेपरवर निवडणूक होणे आवश्यक आहे. आमचा कुणावर अविश्वास आहे असे नव्हे. पण, निवडणुक प्रणालीत पारदर्शीपणा येण्यासाठी आम्ही बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी करतो आहोत. विधानसभा निवडणुकीत बॅलेट पेपरवर ही जनता आणि एनजीओमधूनही मागणी होत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.