Raj Thackeray | (Photo Credits: File Photo)

भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते महाविकासआघाडी (Sena,Maha Vikas Aghadi ) सरकार कधी कोसळणार याबाबत दररोज नवे दावे आणि मुहूर्त आणि दावे करत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मात्र महाविकासआघाडी सरकार पडेल असे वाटत नसल्याचे म्हटले आहे. राज ठाकरे यांच्या विधानामुळे भाजपच्या गोटात भूवया उंचावली जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे तर वारंवार आघाडी सरकारबद्दल भाष्य करत असतात. त्यांनी हे सरकार कोसळण्याची अनेकदा भाकिते केली आहेत. वास्तवात मात्र आतापर्यंत तरी त्यातले एकही भाकीत खरे ठरले नाही.

राज ठाकरे हे सध्या औरांगाबाद दौऱ्यावर आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे महाराष्ट्रभर दौरे करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यानुसार राज ठाकरे यांनी दौरा सुरु केला आहे. काल ते नाशिक दौऱ्यावर होते. आज ते औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. या वेळी त्यांनी पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी बोलताना त्यांनी म्हटले की, हे सरकार पडेल असे वाटत नाही. आपण महाविकासआघाडी सरकारचे घोटाळे काढणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. (हेही वाचा, Raj Thackeray On ST Worker Strike: एसटी कर्मचाऱ्यानां समर्थन देत राज ठाकरेंनी मांडली भुमिका, कर्मचाऱ्यांना समजून घेतले पाहिजे.)

आपण आर्यन खान याची बातमी 28 दिवस चालवतो. सुशांत सिंह प्रकरण, अँटालिया प्रकरण आपण लावून धरतो. पण मधल्या काळात सुमारे पाच लाख उद्योजक देश सोडून गेले कोठे याबाबत आपल्याला शोध घ्यावासा वाटत नाही, अशी खंतही राज ठाकरे यांनी बोलून दाखवली. पाच लाख उद्योजक जेव्हा देश सोडून जातात तेव्हा त्याचा स्थानिक रोजगारावर काय परिणाम होतो याचा विचारही आपण करत नसल्याचे राज ठाकरे म्हणाले.

निवडणुकांच्या तोंडावर हा दौरा आहे असा अर्थ कोणीही काढू नये. निवडणुकांना अद्याप बराचसा अवकाश आहे. त्यातच ओबीसी आरक्षणामुळे या निवडणुका आणखी सात आठ महिने पुढे जाण्याची शक्यता आहे. कोणी मोजायचे यावरुन केंद्र आणि राज्यांमध्ये मोजामोजी सुरु आहे. त्यामुळे या निवडणुका पुढे जाऊ शकतील. दरम्यान, आमच्याकडे मतेच मागायला येऊ नका अशा पाट्या लावण्यास ओबिसींनी सुरुवात केली आहे. आता ओबीसींसमोर जायचे कोणी? हा प्रश्न असल्याने सगळे कचरत असल्याचे राज ठाकरे म्हणाले.