मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Photo Credits-Twitter)

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाकडून काल एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामध्ये आता राज्यात दुकानांवर नामफलक हे ठळक मराठी भाषेतच असावे असा निर्णय जाहीर केला आहे. त्यावर आता मनसे (MNS) कडून प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज एक पत्रक जारी करत मंत्रिमंडळाच्या या निर्णयावर फक्त आणि फक्त महाराष्ट्र मनसैनिकांचा हक्क असल्याचं म्हटलं आहे. इतर कोणीही त्याचं श्रेय लाटण्याचा आचरटपणा करू नये असं ठणकावून सांगितलं आहे. दरम्यान त्यांनी हे पत्रक ट्वीट देखील केले आहे.

मनसे कडून 2008-2009 मध्ये मोठं आंदोलन हाती घेण्यात आले होते. यामध्ये मनसेने त्यांच्या खळ्ळ खट्याक अंदाजात राज्यातील दुकानांवर मराठी पाट्याचं असाव्यात यासाठी रान पेटवलं होतं. आज पत्रकामध्ये राज ठाकरेंनी त्याची आठवण करून देत मनसैनिकांनी यासाठी शेकडोंनी केसेस अंगावर घेतल्या आहेत असे सांगताना त्यांना श्रेय देत मनसैनिकांचं अभिनंदनही केले आहे. यावेळी राज ठाकरेंनी आता सरकारने या निर्णयाची नीट अंमलबजावणी करावी असं सांगितले आहे. सोबतच या निर्णयामध्ये मराठी सोबत इतर भाषांचाही समावेश केला जाऊ शकतो यावरून मात्र टीका केली आहे.

राज ठाकरेंच्या मते, जर महाराष्ट्राची भाषा देवनागरी मराठी आहे. ती सार्‍यांना समजते मग इथे फक्त मराठीच चालणार. याची पुन्हा आठवण करून द्यायला लावू नका. हे देखील वाचा: Marathi Nameplate on Shops: महाराष्ट्रातील दुकानांवर मराठी नामफलक अनिवार्य, मुंबईतील 500 चौरस फुटांखालील घरांच्या करसवलतीसही राज्य सरकारची मान्यता .

राज ठाकरे यांचं ट्वीट

महाराष्ट्र राज्यसरकारच्या नव्या नियमानुसार राज्यात आता  बाजारपेठा आणि इतर ठिकाणी असलेल्या सर्व दुकानांवर मराठी पाट्या असणे बंधनकारक आहे. हा नियम 10 पेक्षा कमी अस्थापना असलेल्या छोट्या दुकानांसह इतर सर्व दुकानांसाठी लागू असणार आहे.