शिवसेना (Shiv Sena) दुरावल्यानंतर रिकामी झालेली मित्राची जागा महाराष्ट्रात भरुन काढण्यासाठी भाजप (BJP) विचार करतो आहे. भाजपचा नव्या मित्राचा शोध राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना ( MNS) या पक्षाजवळ येऊन थांबण्याची शक्यता आहे. राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एका मुलाखती दरम्यान तसे संकेत दिले. राज ठाकरे यांच्यावर स्थुतीसुमने उधळत देवेंद्र फडणीस म्हणाले, ''राज ठाकरे यांचा मराठी माणसाबद्दलचा आग्रह आम्हाला मान्य आहे. हिंदुत्वाचा विषयही मान्य आहे. फक्त एक गोष्ट आम्हाला मान्य होऊ शकत नाही ती म्हणजे परप्रांतीयांच्या संदर्भातील टोकाची भूमिका. त्यामुळे जोपर्यंत आमचे विचार जुळत नाही तोपर्यंत ही मैत्री राजकीयदृष्ट्या होणं शक्य नाही''. देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर राज ठाकरे यांनी आपल्या मूळ भूमिकेत थोडा बदल आणि विस्तार केला तर, भाजप-मनसे युती शक्य आहे, असा अर्थ काढला जाऊ लागला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी द इनसायडर ला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखती त्यांनी विविध विषयावर आपली प्रतिक्रिया दिली. या वेळी बोलताना फडणवीस म्हणाले, राज ठाकरे हे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. ते कोणाच्या म्हणण्याने काही करतील असे नाहीत. त्यांना राजकारण, राजकारणातील नेमकी परिस्थिती चांगली समजते. तसेच, कोणत्या ठिकाणी गर्दी आणि कोणत्या ठिकाणी पोकळी निर्माण झाली आहे हे ही कळते. विविध मुद्द्यांबाबत त्यांची अशी एक स्वतंत्र योजना असते. (हेही वाचा, 'थोरातांची कमळा' गाजला मात्र 'विखे-पाटलांची कमळा' चित्रपट आला व पडला- शिवसेना)
राज ठाकरे यांच्यासोबत जाण्याची अनेकदा इच्छा होती. पण, आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत. सर्वांना सोबत घेऊन चालावे लागते. त्यामुळे मराठी माणसाबद्दलचा आग्रह आम्हाला त्यांचा मान्य आहे. हिंदुत्वाचा विषयही मान्य आहे. फक्त एक गोष्ट आम्हाला मान्य होऊ शकत नाही ती म्हणजे परप्रांतीयांच्या संदर्भातील टोकाची भूमिका. अलिकडे ते व्यापक विचार करत आहेत. शिवसेनेनेही सुरुवातीला मराठी मुद्दाच हाती घेतला होता. मात्र, पुढे त्यांनी हिंदुत्त्वाचा व्यापक मुद्दा हाती घेतला आणि ते राष्ट्रीय पक्ष झाले. त्यांना स्वीकारणाऱ्यांची संख्या वाढली. राज ठाकरे यांच्याही आता लक्षात आले आहे की, मराठी माणूस हा आपला केंद्रबिंदू असलाच पाहिजे. याला व्यापकता दिली नाही तर सध्याच्या परिस्थितीत आपली भूमिका मर्यादित होते. अनेक ठिकाणी भूमिकाही घेता येत नाहीत, असेही देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्याबाबत म्हणाले.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज ठाकरे आणि माझ्यात मैत्रीपूर्ण संबंध आहेत. अनेकदा आम्ही कोणाला काहीही न सांगता भेटोल आहोत. त्यांना भेटले की छान वाटते. आम्ही अनेकदा एकमेकांवर टीका केली आहे. पण त्यांच्याकडे नेहमीच एक विचार असतो. प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोण असतो. त्यांची भूमिका हिंदुत्त्वाच्या दिशेने वळते आहे हे जेव्हा माझ्या ध्यानात आले त्या वेळी त्यांच्या मनात नक्की काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी मी त्यांची भेट घेतली.