राज ठाकरेंनी दिला 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम; अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलीस सतर्क, शहरात 24 तास गस्त
Mumbai Police | (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी 3 मे पर्यंत माशिदिंवरून लाऊडस्पीकर काढून टाकण्याबाबत अल्टिमेटम दिला आहे. जस जसे हा दिवस जवळ येत आहे तस तसे मुंबई पोलीस (Mumbai Police) शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून काळजी घेत आहेत. हिंदू नववर्षाच्या दिवशी गुढीपाडव्यापासून राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेऊन, मशिदीतून लाऊडस्पीकर काढा नाहीतर हनुमान चालिसा वाजतील असा इशारा दिला होता. तेव्हापासून देशामध्ये लाऊडस्पीकरचा मुद्दा चांगलाच तापला आहे.

आता आज मुंबई पोलिसांनी आज सांगितले की, ते कोणतीही परिस्थिती हाताळण्यास सक्षम आहेत. मुंबई शहरातील संवेदनशील क्षेत्रे ओळखण्यात आली आहेत, शहरात 24 तास गस्त घातली जात आहे. 5 मिनिटांत पोलीस कोणत्याही घटनेच्या ठिकाणी पोहोचतील.

लाऊडस्पीकरचा मुद्दा हा धार्मिक विषयापेक्षा सामाजिक प्रश्न आहे, असे सांगून राज ठाकरे म्हणाले होते की, त्यांच्या पक्षाला समाजातील शांतता भंग पावू द्यायची नाही, पण लाऊडस्पीकरचा वापर असाच सुरू राहिला तर मुस्लिमांनाही लाउडस्पीकरवर आमच्या प्रार्थना ऐकाव्या लागतील. आम्ही कोणाची प्रार्थना संपवू इच्छित नाही किंवा त्याच्या विरोधातही नाही. आम्हाला मशिदींच्या वरचे लाऊडस्पीकर खाली घायचे आहेत, जे बेकायदेशीर आहेत ते त्यांनी फक्त काढून टाकावे. (हेही वाचा: महाराष्ट्राला मुद्दाम भडकवण्याचा प्रयत्न? महाराष्ट्र सायबर सेलने हटवल्या सोशल मीडियावरील 700 द्वेषपूर्ण पोस्ट)

लाऊडस्पीकर लावण्याच्या नियमांबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, नियम सर्वांसाठी समान असले पाहिजेत. कोणी राजकीय रॅली काढली तर लाऊडस्पीकरची परवानगी लागते मात्र दिवसातून लाऊडस्पीकरवरील पाच वेळा अजानला कोणी परवानगी घेतो? दरम्यान, राज ठाकरे यांच्या घोषणेनंतर मुंबईतील 72 टक्के मशिदींनी अजानच्या वेळी लाऊडस्पीकरचा आवाज कमी केला आहे. याशिवाय अनेक मशिदींनी सकाळच्या अजानसाठी लाऊडस्पीकरचा वापर बंद केला आहे.