महाराष्ट्र भाजपातून केंद्रीय मंत्रीपदावर वर्णी लागलेल्या नारायण राणे (Narayan Rane) यांचा 'नॉट रिचेबल' असलेला फोन अखेर 'रिचेबल' झाला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. सोमवारी (12 जुलै) सकाळच्या सुमारास दोन्ही नेत्यांमध्ये फोनवरुन संवाद (Raj Thackeray congratulate Narayan Rane) झाल्याचे समजते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पुणे येथे पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन झाले. या वेळी आपण नारायण राणे यांना शुभेच्छा दिल्या का? असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी विचारला. त्यावर उत्तरादाखल बोलताना माझे आणि राणे यांचे बोलणे झाले नाही. मी त्यांना एकदोन वेळा शुभेच्छांसाठी फोन केला होता. परंतू, त्यांचा आणि त्यांच्या दोन्ही मुलांचा फोन नॉट रिचेबल येतो आहे. आता नंतर पुन्हा प्रयत्न करेन असे राज ठाकरे यांनी म्हटले होते.
मराठी खासगी वृत्तवाहीणी असलेल्या टीव्ही 9 ने दिलेल्या वृत्तानुसार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि नारायण राणे यांच्यात आज सकाळी चर्चा झाली. राज ठाकरे आणि नारायण राणे हे दोघेही एकेकाळी शिवसेनेत होते. दरम्यानच्या काळात दोघांनीही शिवसेना सोडली. पुढे दोघांचे राजकीय मार्गही भिन्न झाले. राज ठाकरे यांनी मनसे पक्ष काढला. तर नारायण राणे यांनी शिवसेनेतून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पुढे काँग्रेस सोडून स्वत:चा राजकीय पक्ष काढला. तो पक्ष बर्खास्त करत थेट भाजपमध्ये विलीन केला आणि स्वत:ही भाजपमध्ये प्रवेशकर्ते झाले. भाजपने सध्या त्यांना राज्यसभेत खासदारकी देऊन केंद्रीय मंत्रिपदही दिले आहे. त्यावरुन राज्याच्या राजकारणात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर नारायण राणे आणि विविध राजकीय पक्षांचे नेत यांच्यात काय चर्चा होते याबतब उत्सुकता असते. दरम्यान, राज ठाकरे आणि राणे यांच्यातील चर्चेचा तपशीलबाहेर येऊ शकला नाही. त्यामुळे शुभेच्छेच्या निमित्ताने इतर काही विशेष चर्चा झाली का? याबाबत उत्सुकता कायम आहे. (हेही वाचा, केंद्रीय मंत्रीपदाचा कारभार हातात घेतल्यानंतर नारायण राणे यांनी घेतली अधिकाऱ्यांची शाळा, विचारले 'हे' प्रश्न)
दरम्यान, शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील सख्य सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात होणाऱ्या प्रत्येक संघर्षात शिवसैनिक विरुद्ध राणे समर्थक असा सामना रंगतो. दरम्यान, रविवारी मात्र सिंधुदूर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथे काहीसे वेगळे चित्र पाहायला मिळाले. वेंगुर्ले येथील एका कार्यक्रमात राणेपूत्र आमदार नितेश राणे आणि खासदार विनायक राऊत एकत्र येताना दिसले. निमित्त होते वेंगुर्ले नगर परिषद सागररत्न मत्स्य बाजारपेठ लोकार्पण सोहळ्याचे. या कार्यक्रमात हे दोन्ही नेते एकत्र आले इतकेच नव्हे तर एकमेकांच्या कानात हितगूज करतानाही दिसले. त्यामुळे भविष्यात शिवसेना आणि राणे सूर जूळण्याचे आणि शिवसेना भाजप युती पुन्हा होण्याची चिन्हे दिसल्याची चर्चा अनेकांनी सुरु केली आहे. भविष्यात काय होईल हे तेव्हाचे तेव्हाच कळेल सध्या मात्र दोन्ही गटांमध्ये काहीसे शांततेचे वातावरण आहे हे दिलासादायक.