राज्याच्या विविध भागात पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. मुंबईत (Mumbai) देखील पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. राज्यात विदर्भासह कोकण आणि मुंबई परिसरात पावसानं चांगली हजेरी लावली आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांना (Farmers) देखील काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, काही ठिकाणी अद्यापही पावसाची प्रतिक्षा कायम आहे. पुढच्या आठवड्यात आषाढी वारीचा (Aashadhi Wari) सोहळा आहे. त्यापूर्वीच पंढरपूरमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळं पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. ( हेही वाचा - Mansoon Update: महाराष्ट्रात मेघराजाचे आगमन, हवामान खात्याकडून 'ह्या' राज्यांसाठी ऑरेंज अर्लट)
पावसाने गडचिरोलीस परिसरात हजेरी लावली. त्यामुळं उकाड्यानं त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागून होती. मात्र, पाऊस सतत हुलकावणी देत असल्यानं शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. त्यातच तापमानात प्रचंड वाढ झाली होती. खरीप पूर्व मशागतीची कामं पूर्ण झाली असून, पेरणीसाठी शेतकरी सज्ज आहेत. पावसामुळं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून, समाधानकारक पाऊस झाल्यास पेरणीच्या कामांना वेग येणार आहे.
मोठ्या प्रतीक्षेनंतर चिपळूणमध्ये मान्सूनच्या सरी बरसल्या आहेत. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचे आगमन झाल्यानं शेतकरी सुखावला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. पावसाचे आगमन झाल्यानं शेतकऱ्यांचे दुबार पेरणीचे संकट टळले आहे. या पावसामुळं आता कोकणात शेतीच्या कामांना वेग येणार आहे.