राहुल गांधी यांचा सल्ला, सुजय विखे पाटील भाजप प्रवेश आणि नगरची उमेदवारी यावर राधाकृष्ण विखे पाटील यांचे भाष्य
Radhakrishna Vikhe Patil | (फोटो सौजन्य-फेसबुक)

Lok Sabha Elections 2019: चिरंजीव सुजय विखे पाटील (Sujay Vikhe-Patil) यांचा भाजप (BJP) प्रवेश, राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याशी सुजय यांच्या उमेदवारीबाबत झालेली चर्चा, काँग्रेस (Congress) अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलेला सल्ला, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा, शरद पवार (Sharad Pawar) यांची भूमिका आणि इतर बऱ्याच मुद्द्यांवर काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी विस्तृत भाष्य करत आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. लोणी येथे आयोजित पत्रकार परिषदेत राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते. अहमदनगर लोकसभा मतदारसंघ (Ahmednagar Lok Sabha constituency) काँग्रेस उमेदवार म्हणून आम्हाला हवी होती. त्यासाठी राहुल गांधी यांची भेट घेतली. या जागेसाठी मी प्रयत्न करेन असे राहुल गांधी बोलतील अशी आपेक्षा होती. मात्र, राहुल गांधी यांनी थेट सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या तिकिटावरुन उमेदवारी लढावी, असा सल्ला त्यांनी आपल्याला दिला, असा गौप्यस्फोट राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. विधानसभेतील विरोधी पक्ष नेते पद साडेचार वर्षे सांभाळून जर काँग्रेसऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवायची तर त्याचे फलीत काय? असेही राधाकृष्ण विखे पाटील या वेळी म्हणाले.

डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारीबाबत राहुल गांधी यांच्याशी चर्चा सुरु असतानाच शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात आमचे वडील बाळासाहेब विखे पाटील यांचा अपमान होईल असे वक्तव्य केले. त्यांनी आमच्या वडीलांबाबत केलेले वक्तव्य वेदनादाई होते. शदर पवार यांची ही पत्रकार परिषद संपताच सुजय विखे यांनी भाजपमध्ये जाण्याची घोषणा केली. आपल्या मुलानेच भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे आपण यापुढे विरोधी पक्ष नेते पदावर राहायचे नाही, असा निर्णय घेतला होता. तसेच, ज्या राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या वडीलांचा अपमान केला. त्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी नगरमध्ये जाणार नाही, असाही निर्णय आपण घेतला होता. तसेच, तो जाहीरही केला होता, असे विखे पाटील यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, राधाकृष्ण विखे पाटील यांची शिवसेना पक्षाच्या मंचावर उपस्थिती, राजकीय चर्चांना उधाण)

या वेळी बोलताना आपण, साडेचार वर्षांच्या काळात आपण विधिमंडळ कामकाजात विरोधी पक्ष नेता म्हणून शक्य तितका पदाला न्याय द्यायचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्याचाही प्रयत्न केला. त्याचा पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये चांगला फायदा झाला. मी प्रयत्न केल्यानेच सरकारला शेतकरी कर्जमाफी द्यावी लागली असेही राधाकृष्ण विखे-पाटील यावेळी म्हणाले.(हेही वाचा, अहमदनगर: राधाकृष्ण विखे पाटील यांचा विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा, अशोक चव्हाण यांनी दिली माहिती)

दरम्यान, अहमदनगरची जागा उमेदवारीसाठी काँग्रेसकडे येऊ नये यासाठी पक्षातीलच काहींनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले, असा बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता अप्रत्यक्ष आरोपही राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.दरम्यान, सभागृहात काम करत असताना आपल्याला हवा तसा पाठिंबा मिळाला नाही, असेही राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.