प्रतीकात्मक फोटो (Photo Credit: Pixabay)

पुण्यातील (Pune) एका आयटी कंपनीत अभियंता म्हणून काम करणाऱ्या एका महिलेला सायबर भामट्याने (Cyber Fraud) ऑनलाइन पोर्टलद्वारे (Online Portal) लग्नाचे आमिष दाखवून 11 लाख रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी 29 वर्षीय पीडितेने मंगळवारी विमंतल पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला. पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार पतीचा शोध घेत असून तिने तिचे वैयक्तिक माहिती एका मॅरेज पोर्टलवर पोस्ट केले आहेत. बनावट नाव आणि फोटो वापरून एका सायबर भामट्याने या पोर्टलद्वारे तिच्याशी संपर्क साधला. फसवणूक करणारा हा एका परदेशी कंपनीत अधिकारी असल्याचे सांगत होता. त्याने महिलेशी ऑनलाइन संवाद साधत तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिले.

काही दिवसांनी त्याने महिलेला परदेशातून महागडे गिफ्ट पाठवल्याचे सांगितले. पण, विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांनी ही भेटवस्तू जप्त केल्याचे त्यांनी सांगितले. फसवणूक करणाऱ्याने महिलेसोबत काही बँक खाते क्रमांक शेअर केले आणि कस्टम विभागाकडून भेटवस्तू ‘रिलीज’ करण्यासाठी विविध शुल्क म्हणून त्यामध्ये पैसे जमा करण्यास सांगितले. (हे देखील वाचा: Nashik Crime: कौटुंबिक वादात वडिलांनी केली मुलाला माराहाण, उपचारादरम्यान मुलाचा मृत्यु, नाशिक येथील घटना)

पोलिसांनी सांगितले की, महिलेने या बँक खात्यांमध्ये सुमारे 11.16 लाख रुपये ट्रान्सफर केले, परंतु भेट मिळाली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अभियंत्याने पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली.