MNS | (Photo Credits: Twitter)

ज्ञानवापी मशीद वादाच्या (Gyanvapi Masjid Row) पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा पक्ष मनसेने (MNS) महाराष्ट्रातील पुणे (Pune) शहरातील पुण्येश्वर मंदिराच्या जमिनीवर दोन दर्गे बांधल्याचा दावा केला आहे. मनसेचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी रविवारी सांगितले की, याबाबत त्यांनी पुण्येश्वर मुक्ती मोहीम सुरू केली आहे. त्यांनी मंदिराची जमीन जीर्णोद्धार करण्यासाठी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या लढ्याला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. ज्ञानवापी मशिदीच्या नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणाचा संदर्भ देत शिंदे म्हणाले की, हिंदुत्वाबाबत राज ठाकरेंच्या भूमिमुळे सरकार जागे होत आहे.

मनसेचे सरचिटणीस अजय शिंदे म्हणाले की, ज्ञानवापीप्रमाणे आम्ही पुण्याच्या पुण्येश्वर मंदिरासाठीही लढत आहोत. खिलजी घराण्याचा शासक अलाउद्दीन खिलजी याच्या एका सेनापतीने पुण्यातील पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिरे पाडली होती आणि नंतर त्या जमिनीवर दर्गा बांधण्यात आल्याचा दावा शिंदे यांनी केला. या दर्ग्यांच्या ठिकाणी असलेल्या मूळ मंदिरांच्या मुक्तीसाठी पुढच्या काळात लढा उभा केला जाईल, असेही ते म्हणाले.

शिंदे यांनी या दर्ग्याच्या जागा नमूद करताना सांगितले की, एक मंदिर शनिवारवाड्याच्या बरोबर समोर आहे. तर दुसरं मंदिर लालमहालाच्या पलीकडील बाजूला कुंभार वेसजवळ आहे. तिथे आज छोटा शेख दर्गा आहे. या मशिदी तिथली मंदिरे पडून उभ्या केल्या आहेत. याबाबत त्यांनी पुरातत्व विभाग आणि राज्य सरकारला पत्रही लिहिले आहे. शिंदे यांच्या या भूमिकेला हिंदू महासंघाच्या आनंद दवे यांनीही पाठिंबा दिला आहे. यापूर्वी रविवारी पुण्यातील जाहीर सभेत बोलताना राज ठाकरे यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची मागणी केली होती. (हेही वाचा: अयोद्धा दौर्‍याला विरोधाची रसद महाराष्ट्रातून; राज ठाकरेंचा मोठा आरोप)

दरम्यान, ज्ञानवापी मशीद वाद प्रकरणी आज वाराणसीच्या जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. हा निर्णय उद्या दुपारी दोन वाजता येईल. याचा सरळ अर्थ असा की, या वादाच्या पुढील सुनावणीची प्रक्रिया काय असावी, या आधारावर जिल्हा न्यायालयाने आपला आदेश राखून ठेवला आहे.