Pune Traffic | Representational Image. (Photo Credits: Pixabay)

वाहन चालवताना नियम मोडला की वाहतुक पोलीस (Pune Traffic Police) लगेच दंड ठोठावतात. त्यामुळे ट्रॅफीक पोलीस (Traffic Police) काकांशी थोडं सांभाळूनच असावं लागतं. कधीमधी वाहतूक पोलीस आणि वाहनचालक यांच्यात वादावादीही होते. यावर पुणे पोलिसांनी नामी उपाय शोधला पुणे वाहतुक पोलीस आता थेट दंड आकारणार नाहीत. पुणेकरांना (Punekars ) आता सीसीटीव्हीच्या माध्यमातूनच दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे जर सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्याच्या नजरेत तुमची चुक पकडली गेली. तर तुम्हाला थेट ऑनलाईन दंडच ( E- Payment) भरावा लागणार आहे.

वाहतुकीचा नियम मोडला तर दंडाच्या नावाखाली वाहतूक पोलीस बेकायदेशीर पद्धतीने पैसे घेतात. ज्याची कोणतीही नोंद, पावती, पुरावा मिळत नाही. पुणेकरांनी अशी लेखी तक्रार उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पुणे पोलीस आयुत्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे केली होती. या तक्रारींची तातडीने दखल घेत पुणे पोलिसांनी पावले टाकली आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेत आदेश दिले आहेत. या आदेशानुसार पुढील आदेश येई पर्यंत पुणे वाहतूक पोलिसांना दंड आकारता येणार नाही. (हेही वाचा, मुंबई: E-Challan न भरल्याने जवळपास 2 हजार Driving License रद्द)

पुणे वाहतुक पोलिसांना आयुक्तालयाकडून आदेश देण्यात आले आहे की, पुणे पोलिसांनी पुढील आदेश येईपर्यंत कोणत्याही पद्धतीने दंडात्मक काराई करु नये. दंड वसूलही करु नये. केवळ शहरातील वाहतूक कशी सुरळीत पार पडेल याचीच काळजी घ्यावी. त्यासाठी प्रयत्न करावेत. शहरात जो कोणी वाहतुकीच नियम मोडेन त्याला सीसीटीव्हीच्या माध्यमातून दंड आकारला जाईल, असे पत्रक पोलीस आयुक्त अभिनव गुप्ता यांनी काढले आहे.

पुणेकर नागरिकांनी आयुक्त आणि उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या लेखी तक्रारीत म्हटले होते की, आज ई-चलन, जॅमर असे पर्याय उपलब्ध असताना नागरिकांना टोईंगचा भुर्दंड कशासाठी? असा सवाल उपस्थित केला जातो आहे. मुंबईत नो पार्किंग परिसरात असलेली वाहने टोईंग करुन नेण्याची पद्धत प्रायोगिक तत्वावर बंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुण्यातही अशाच पद्धतीचा प्रयोग करावा अशी मागणी होत आहे. पुणे पोलिसांनी या मागणीला तत्काळ प्रतिसाद देत एक पाऊल पुढे टाकले आहे.