Pune Shocker: हरियाणाच्या विद्यार्थिनीचा रूममेट्सवर खंडणी, विवस्त्र करणे विनयभंगाचा आरोप; महाराष्ट्र पोलिसांकडून तपास सुरू
Maharashtra Police | (File Photo)

हरियाणातील (Haryana) एका विद्यार्थिनीने तिच्या रूममेट्सवर खंडणी मागणे, विवस्त्र करणे, ब्लॅकमेल आणि विनयभंगाचे आरोप केले आहेत. ही घटना विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात (Pune) घडली आहे. याबाबत विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर पुण्यातील महाराष्ट्र पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. ही घटना 17 ऑक्टोबर रोजी घडली होती. मिळालेल्या माहितीनुसार, वाघोली येथील एका महाविद्यालयातील दोन विद्यार्थिनींनी पिडीत विद्यार्थिनीवर सोनसाखळी आणि लॅपटॉप चोरल्याचा आरोप केला होता. मात्र तिने हा आरोप नाकारला.

नंतर, या दोन मुलींनी पिडीत मुलीला धडा शिकवण्यासाठी तीन पुरुष विद्यार्थ्यांना बोलावले. सर्वांनी मिळून वाघोली येथील त्यांच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये तिला पूर्णतः विवस्त्र केले व तिची शारीरिक तपासणी केली. त्यानंतर या पाच जणांनी मिळून कथितरित्या पीडित मुलीचे सामान आणि इतर गोष्टी तपासल्या. सोबतच पिडीत मुलगी सतत विनवणी करूनही तिच्या इच्छेविरुद्ध संपूर्ण घटना मोबाइल फोनवर कॅप्चर केली केली. हे पाचही मित्र देशातील वेगवेगळ्या राज्यातील आहेत. (हेही वाचा: लग्नापूर्वी सेक्स केल्यास थेट तुरुंगवासाची शिक्षा; नव्या धक्कादायक कायद्याची देशभर चर्चा)

याबाबत पोलिसात चोरीची तक्रार देण्याची आणि शूट केलेला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत या 5 जणांनी पिडीत मुलीकडून 80 हजार रुपये उकळले. तिचा मोबाईल आणि लॅपटॉप यांसारख्या वैयक्तिक वस्तू काढून घेतल्या. या सर्व जाचाला कंटाळून पीडित मुलीने त्यांना पैसे दिले व ती तिच्या घरी परत गेली. नंतर तिने तिथे स्थानिक पोलिसांकडे तक्रार नोंदवली, ज्यांनी अलीकडेच अधिक तपशीलवार तपासासाठी ही तक्रार पुणे पोलिसांच्या लोणीकंद पोलीस ठाण्यात पाठवली.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पीडित तरुणी व इतर जण वाघोली येथील एकाच महाविद्यालयात वर्गमित्र आहेत. पोलिसांनी कथित घटनांची प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. त्यांनी पीडितेला पुण्यात येऊन तिचे तपशीलवार निवेदन नोंदवण्याची विनंती केली आहे, जेणेकरुन पोलीस या प्रकरणी पुढील कारवाई करू शकतील.