Pune: पुण्यातील चाकण परिसरात 3 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल
Representational Image (Photo Credits: PTI)

देशात महिला अत्याचार आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या बलात्काराचे सत्र थांबायला तयार नाही. देशातील विविध कोपऱ्यातून दररोज हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत. अशातच पुणे (Pune) येथून सर्वांना चिंतेत टाकणारी माहिती उघडकीस आली आहे. पुण्यातील चाकण परिसरात 54 वर्षाच्या व्यक्तीने एका 3 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.

कालूराम शांताराम गावडे (वय, 54) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी हा चाकण येथील रहिवाशी आहे. दरम्यान, पीडित मुलगी बागेत खेळत असताना आरोपी तिच्याजवळ आला. त्यानंतर त्याने पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केले. ही घटना 14 मे रोजी रात्री आठच्या सुमारास घडली आहे. त्यानंतर 16 मे रोजी सकाळी आरोपी विरुद्ध चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, आरोपीला स्थानिक न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. हे देखील वाचा- Cyclone Tauktae: उल्हासनगर येथे धावत्या रिक्षावर झाड उन्मळून पडले; एका प्रवाशाचा मृत्यू, रिक्षा चालकासह 2 जण जखमी

ही घटना ताजी असताना पुण्यात आज आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाचे आमिष दाखवून एका 22 वर्षीय तरूणाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर रुग्णालयात गेली. त्यानंतर डॉक्टरांनी हा प्रकार पोलिसांना सांगितला. ज्यामुळे ही घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सिंहरोड पोलीस अधिक चौकशी करत आहेत.