तंत्रज्ञान प्रगत झाल्याने आता अनेक लहान मोठ्या गोष्टींसाठी आपण विविध अॅप्सवर विसंबून रहायला लागलो आहोत. गूगल मॅप्स (Google Maps) वरून असाच रस्ता शोधणं एका तरूणीच्या जीवावर बेतल्याची दु:खद घटना समोर आली आहे. पुण्यात (Pune) सिंहगडावर (Sinhgad) गेलेली तरूणी परतीचा प्रवास करताना रस्ता चूकली. तरूणासोबत मागे बसलेल्या तरूणीने गूगल मॅप्सच्या मदतीने रस्ता शोधण्याचा प्रयत्न केला. पण हा रस्ता चूकीचा होता. ही बाब त्यांच्या लक्षात आल्यानंतर महामार्गावरून वळण घेण्याचा प्रयत्न करत असताना एका भरधाव ट्रकची धडक बसली आणि तरूणीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्ग परिसरात झाला आहे.
अपघाताच्या वेळी नटराज अनिलकुमार दुचाकी चालवत होता तर रिदा इम्तियाज मुकादम ही तरूणी त्याच्यासोबत प्रवास करत होती. रिदा आणि नटराज दोघेही इंजिनियर होते. पुण्यात आयटी कंपनी मध्ये ते काम करत होते. ते सिंहगडावर फिरायला गेले होते. तेथून त्यांना वानवडीला जायचं होतं. त्यासाठी त्यांनी गूगल मॅप्सवर रस्ता शोधण्याचा पर्याय निवडला. ते मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर आले. तेथून नवीन कात्रज बोगद्याच्या दिशेने गेले. दरम्यान आपण रस्ता चूकल्याचं लक्षात आल्यानंतर नटराजने तेथून मागे फिरण्याचा निर्णय घेतला.
नवीन कात्रज बोगद्याजवळून वळण घेताना घात झाला. त्या मार्गावरून भरधाव वेगात येणार्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये रिदाच्या डोक्याला मार लागला. अपघातानंतर ट्रक चालकाने तेथून पळ काढला. जखमी नटराजने भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.