Pune (Photo credits: Wikipedia)

सध्या सुट्ट्यांचा काळ सुरू झाला आहे. वर्षअखेरीच्या निमित्ताने अनेकजण फिरण्यासाठी बाहेर पडत आहेत. त्यामुळे वाहतूक सेवेवर मोठा ताण आला आहे. प्रवासापूर्वी तांत्रिक आणि सुरक्षेच्या बाबी पूर्ण करण्यासाठी विमानतळावर काही तास आधी पोहचावं लागतं. आता असाच काही नियम पुणे स्थानकामध्येही करण्यात आला आहे. पुणे स्थानकात (Pune Station) मागील काही दिवसांत वाढती प्रवासी संख्या आणि चेन खेचण्याच्या घटना पाहता प्रवाशांना आता नियोजित ट्रेन सुटण्याच्या आधीच एक तास प्रवाशांनी स्टेशन वर यावं असं आवाहन केले आहे. दरम्यान पुणे स्थानकातून सुटणार्‍या ट्रेनमध्ये हे चेन ओढण्याचं प्रमाण अधिक आहे.

पुण्यात मागील काही दिवसां मध्ये वाहतूक कोंडीची समस्या जाणवत आहे. यामुळे प्रवासी रेल्वेच्या वेळेत स्टेशन वर पोहचत नाहीत. परिणामी त्याचे नातेवाईक ट्रेनची चेन खेचतात. यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत आहे. दरम्यान आता हे प्रकार रोखण्यासाठी प्रवाशांना नियोजित ट्रेनच्या तासभर आधी स्टेशन वर पोहचण्याचं आवाहन करण्यात येत आहे. नक्की वाचा: Indian Railway: रेल्वेचं तत्काळ तिकीट बुक करायचं आहे? या सोप्या टिप्स वापरत करा झटपट रेल्वे तिकीटाचं बुकींग.

जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान रेल्वेत चेन खेचण्याच्या 1164 घटना समोर आल्या आहेत. यामध्ये 914 प्रवशांना अटकही झाली आहे. त्यांच्याकडून 1 लाख 80 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. आता हा दंड भरण्याची वेळ येऊ नये अशी अपेक्षा असेल तर तासभर आधी स्टेशन वर पोहचा अशा सूचना रेल्वे प्रवाशांना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

पुण्यामध्ये मागील काही दिवसांत संध्याकाळच्या वेळी वाहतूक कोंडी वाढली आहे. या वेळेतच पुण्यातून गोरखपूर, इंदूर, कोलकाता, जम्मू मध्ये अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या सुटतात. त्यामुळे त्यांचे नातेवाईक ट्रेनची चेन खेचून गाडी थांबवण्याचा प्रयत्न करतात. रेल्वेच्या निदर्शनात आलेल्या माहितिनुसार या चेन खेचण्याचे प्रकार संध्याकाळच्या वेळेस अधिक आहेत.