पुणेकरांच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग म्हणजे पुणेरी पाट्या! शालजोडीतून समोरच्याला मार्मिक समज देणे असो वा एखाद्या विषयावर विनोदी शैलीतून उत्तर द्यायचे असो या पाट्यांचा फॉर्म्युला नेहमीच हिट ठरतो. याच पुणेरी (Pune) पाट्यांचा वापर करून आता पुणे पोलिसांनी पुणेकरांमध्ये प्रबोधन करायचा विडा उचलला आहे. पुणेरी पोलीस पाट्या या अनोख्या उपक्रमाच्या अंतर्गत आता सार्वजनिक ठिकाणी नियमाचे पालन करण्याचे संदेश देणाऱ्या पाट्या पुण्यात लावण्यात येणार आहेत. नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांबद्दल जनजागृती करण्यासाठी, पुणे शहर पोलीस (Pune Police) आणि भारतीय कला प्रसारिणी सभा यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाला 14 जून ला सुरवात करण्यात आली.
पुणे पोलीस ट्विट
पुणे शहरात वाहतुकीच्या नियमांबद्दल जनजागृती करण्यासाठी, पुणे शहर पोलीस आणि भारतीय कला प्रसारिणी सभा यांच्या संयुक्त विद्यमाने, आज ‘पुणेरी (पोलीस) पाट्या’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचा शुभारंभ, पुणे शहर पोलीस आयुक्त डॉ. श्री. के. व्यंकटेशम यांच्या शुभहस्ते करण्यात आला. #पुणेरीपाट्या pic.twitter.com/CKM7FfqxzA
— PUNE POLICE (@PuneCityPolice) June 14, 2019
मागील आठवड्यात या उपक्रमाचे उद्घाटन पुण्याचे पाेलीस आयुक्त डाॅ. के. व्यंकटेशम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बाेलताना व्यंकटेशम म्हणाले की, "साेशल मीडियाच्या आधीपासून पुण्यात पुणेरी पाट्यांची संस्कृती आहे. त्यामुळे पुणेकरांना नियमांचं महत्त्व पटवून देण्यासाठी या संस्कृतीचा आधार घ्यावा असे वाटले. ही कल्पना अन्य अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर अवघ्या चार ते पाच दिवसांमध्ये त्यांनी या पाट्या तयार केल्या. याला अधिकाऱ्यांबराेबरच नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे". खरतर पुणेरी पाट्यांचा नागरिकांशी असलेला सांस्कृतिक संबंध पाहता पुणेरी पोलिसांनी अगदी अचूक नस पकडली आहे असे म्हणायला हरकत नाही. पुण्यात हेल्मेटसक्ती नाही; पुणेकरांना शिस्त लावण्याचा पोलिसांचा प्रयत्न अयशस्वी
पाहा काय म्हणतायत पुणेरी पाट्या...
- नकाे बंड, नकाे दंड हेल्मेट घालुन, डाेक ठेवु थंड
- वाईटाची कराल संगत तर जेल मध्येच मिळेल पंगत
- हेल्मेट नसे त्याशी यमराज दिसे
- लाेकांना आपल्यामुळे त्रास झाल्यास आपल्यालाही कायद्याप्रमाणे त्रास हाेईल
- चाेवीस तास ड्युटीवरच स्वारी, पाेलिसांची गड्या गाेष्टच न्यारी
- पुरुष आणि स्त्री असा काेणताही भेदभाव नसलेला सेल म्हणजे भराेसा सेल.
- 100नंबर फुकट आहे म्ह्णून कोणत्याही कारणासाठी डायल करू नका
- स्वच्छ शहर हे नागरिकांचे आचरण सुधारल्याचे लक्षण असते.
आपल्याच भाषेत आपल्याला मिळालेला हा धडा आता पुणेकरांच्या अंगवळणी पडतोय का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.