पुण्यात हेल्मेटसक्ती नाही; पुणेकरांना शिस्त लावण्याचा पोलिसांचा प्रयत्न अयशस्वी
Helmet | (Archived and representative images)

पुणेकरांना वाहतुकीची शिस्त लावण्याचा पुणे पोलिसांचा (Pune Police) प्रयत्न अखेर अयशस्वी झाला आहे. पुणेकरांच्या हट्टापुढे वाहतूक पोलिसांना मागार घ्यवी लागली. त्यामुळे पुण्यात हेल्मेटसक्ती होऊ शकली नाही. पुणे शहरात 1 जानेवारीपासून हेल्मेटसक्ती जाहीर झाल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे पुण्यात दुचाकी चालवताना डोक्याला हेल्मेट (Helmet)नसल्यास पोलिस कारवाई होणार, अशा चर्चा रंगल्या होत्या. पण, प्रत्यक्षात हा निर्णय काही अंमलात आलाच नाही. उलट आपण हेल्मेटसक्तीची कोणतीही तारीख जाहीर केली नव्हती असे वाहतूक पोलीस उपायुक्त तेजस्विनी सातपुते यांनी सांगिले. त्यामुळे पुण्यात हेल्मेटसक्ती ही केवळ अफवा होती काय अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

दरम्यान, हेल्मेटसक्तीबाबत कारवाई करण्यासाठी कोणताही विशेष असा दिवस ठरविण्याची गरज नाही. आम्ही केवळ नागरिकांना शिस्त लागावी यासाठी प्रयत्न करत आहोत, असेही पोलीस उपायुक्त तेजस्विनी सातपुते यांनी म्हटले आहे. पुणे शहर वाहतूक पोलिसांकडून हेल्मेटसक्ती करण्यासाठी या आधीही अनेकदा प्रयत्न झाले होते. पोलिसांच्या या निर्णयाला पुणेकरांनी वेळोवेळी विरोध केला आहे. पोलिसांनी लागू केलेल्या हेल्मेटसक्ती विरोधात नागरिकांनी अनेकदा आंदोलनेही केली आहेत. खास करुन पुण्यातील विविध संघटना, संस्था आणि राजकीय पक्षांचा या निर्णयाला तीव्र विरोध आहे.

दुसऱ्या बाजूला हेल्मेटसक्ती विरोधी कृती समितीची एक बैठकरी पार पडली. येत्या 3 जानेवारी रोजी हेल्मेटसक्तीविरोधात रॅली काढण्याचा निर्णय झाला, असल्याचे समजते. ही रॅली पत्रकार संघ ते पुणे पोलीस आयुक्तालय अशी निघेल. पुणे पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांना निवेदन दिल्यानंतर रॅलीची समाप्ती होणार आहे.