पोलिसांचा लाठीचार्ज (Photo Credit : Twitter)

आपल्या विविध मागण्यांसाठी पुण्याच्या समाजकल्याण आयुक्तालयावर मोर्चा घेऊन गेलेल्या कर्णबधीर लोकांच्या मोर्च्यावर पोलिसांनी चक्क लाठीमार केल्याची धक्कादायक बाब घडली आहे. पोलिसांनी केलेल्या या लाठीचार्जमध्ये काही तरुण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या मोर्चात सुमारे एक हजार कर्णबधीर सहभागी झाले होते. पोलिसांनी केलेल्या लाठीमारानंतर एकच गोंधळ उडाला, संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन सुरु केले. मात्र पोलिसांनी अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे सांगितले आहे. विध्यार्थी बेफाम झाले होते, आम्ही फक्त त्यांना आवरण्याचा प्रयत्न करत होतो असे पोलिसांनी सांगितले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, यामध्ये स्पष्टपणे पोलीसच बेफाम होऊन विद्यार्थ्यांवर हल्ला करत असलेले दिसत आहेत.

हे विद्यार्थी काय म्हणत आहेत, आणि आम्ही काय सांगत आहोत हे एकमेकांना न समजल्याचे गोंधळ वाढला असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुजावर यांनी सांगितले. त्यांनी काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे. आता आंदोलक कर्णबधीर विद्यार्थ्यांनी रास्ता रोको केला असून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. महाराष्ट्रात 18 लाख कर्णबधीर लोक आहेत, मात्र सरकार नेहमीच त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आले असल्याचे या तरुणांचे म्हणणे आहे. योग्य शिक्षण आणि रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध व्हाव्या या आंदोलकांच्या मुख्य मागण्या आहेत. (हेही वाचा: चर्चेत तोडगा निघाल्याने शेतकरी समाधानी; किसान सभेचे आंदोलन मागे)

आम्ही इंजिनिअरिंगसारखे व्यावसायिक शिक्षण घेण्यास तयार असताना भाषेचा अडसर असल्याने आम्हाला घेता येत नाही. अशा परिस्थितीत सरकारकडून मात्र भाषा दुभाजक देण्याची तयारीही दाखवली जात नाही. सरकारने जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत किंवा यावर काही ठोस पावले उचलली नाहीत तर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू आणि मुंबईवरही मोर्चा काढून चालून जाऊ असा इशारा या आंदोलकांनी दिला आहे.