पुण्याच्या (Pune) पाषाणकर उद्योग समूहाचे प्रमुख गौतम पाषाणकर (Gautam Pashankar) अखेर सापडले आहेत. तब्बल एक महिन्यानंतर त्यांचा शोध लागला आहे. 21 ऑक्टोबर रोजी अचानक बेपत्ता झालेले गौतम पाषाणकर जयपूर (Jaipur) येथे सापडले. त्यानंतर तपासादरम्यान त्यांची सुसाईड नोट समोर आल्याने एकच खळबळ उडाली होती. त्या सुसाईड नोट मध्ये व्यवसायातील आर्थिक नुकसानामुळे आत्महत्या करत असल्याचं म्हटलं होतं.
गौतम पाषाणकर बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबाने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. पाषाणकर राज्याबाहेर गेले असावेत अशी माहिती पोलीस निरीक्षक ताकवले यांना त्यांच्या सूत्रांकडून मिळाली होती. त्यामुळे त्या दृष्टीने पोलिस तपास करत होते. दरम्यान, मंगळवारी दुपारी 3 वाजता गौतम पाषाणकर जयपूर येथील एका हॉटेलमध्ये असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. सध्या त्यांना पुण्यात परत आणण्याची प्रक्रीया सुरु आहे. (Pashankar Auto चे संचालक गौतम पाषाणकर 9 दिवस उलटले तरीही बेपत्ता, पत्नीने घरी परतण्यासाठी घातली साद)
काय आहे नेमकं प्रकरण?
गौतम पाषाणकर, बुधवार 21 ऑक्टोबर रोजी कामानिमित्त घराबाहेर पडले. लोणी काळभोर भागात कौटुंबिक व्यवसायाचा एक भाग असलेल्या गॅस प्लांटला त्यांनी भेट दिली. त्यानंतर घरी परतत असताना संध्याकाळी साडे चारच्या सुमारास त्यांनी चालकाला रस्त्यामध्ये गाडी थांबवण्यास सांगितले. ड्रायव्हरला चेक घेण्यासाठी पाठवले आणि त्यांनी रस्ता क्रॉस केला. मात्र नंतर ते घरीच परतलेच नाहीत. त्यानंतर कुटुंबियांनी शिवाजी नगर पोलिस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली. दरम्यान, त्यांची सुसाईट नोट हाती लागल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात होते.
गौतम पाषाणकर बेपत्ता झाल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी त्यांचे फोटो जाहीर करत त्यांना कोही पाहिलं किंवा इतर माहिती मिळाल्यास पोलिसांना कळवण्याचे आवाहन केले होते. आता पाषाणकर सापडले असले तरी ते नेमके कोणत्या कारणामुळे बेपत्ता होते, हे अद्याप कळू शकलेले नाही.