Pune News: अल्पवयीन मुलांचा खाणीतील पाण्यात बुडून मृत्यू, पुण्यातील वाघोली येथील घटना
Drowning प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

Pune News:  पुण्यातील  (Pune) वाघोली येथील खाणीत पोहायला गेलेल्या दोन मुलांचा बुडून दुदैवी मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी दुपारी घडली आहे. या घटनेनंतर वाघोलीत एकच खळबळ उडाली आहे. अली अहमद शेख (वय 12), कार्तिक दशरथ दुखरे (वय 12) अशी धरणात  बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहे. हे दोघेही  वाघोली येखील शिवरकर वस्ती येथील रहिवासी होते. ( हेही वाचा- पाण्याचा बादलीत पडून १० वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू, पनवेल येथील घटना)

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी कार्तिक आणि अली हे दोघे जण वाघोलीतील खाणीत पोहण्यासाठी गेले होते. यावेळी अली आणि कार्तिक सोबत आणखी काही मित्र होते. ते सर्व जण पाण्यात उतरले. खुप वेळ ते पाण्यात खेळत होते. डुबकी घेत असताना अली आणि कार्तिकला पाण्याचा खोलीचा अंदाज आला नाही. त्यामुळे ते दोघेही बुडाले. सोबत असलेल्या मित्रांना काही वेळाने ही घटना लक्षात आली. त्यानंतर त्यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली.

या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांना देण्यात आले. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिस आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाला ही माहिती कळविण्यात आली. घटनास्थळी अग्निशमन दलाचे अधिकारी आणि पथक पोहोचले. बचावकार्य सुरु करण्यात आले. काही वेळाने दोघांनाही पाण्यातून बाहेर काढण्यात आले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच दोघां मित्रांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती कुटुंबियांना देण्यात आली. या घटनेमुळे दोन्ही मुलांच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे.