Pune: पुण्यातील जवळजवळ 19,000 कुटुंबांना सरकारकडून मिळणार 50,000 ची आर्थिक मदत; या महिन्यापासून प्रक्रिया सुरु
Coronavirus. (Photo Credit: PTI)

कोरोना विषाणूमुळे (Coronavirus) एक किंवा अधिक सदस्य गमावलेल्या पुणे (Pune) जिल्ह्यातील कुटुंबांना 50,000 रुपयांची मदत केली जाणार आहे. अशा 18,956 पेक्षा जास्त कुटुंबांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही आर्थिक मदत देण्याचे काम या महिन्यापासून सुरू होईल. राज्याच्या मदत आणि पुनर्विकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्या हवाल्याने 'द इंडियन एक्सप्रेस'ने हे वृत्त दिले आहे. यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करून राज्य सरकारकडून एक सॉफ्टवेअर तयार केले जात आहे. यामुळे कोरोना प्रभावित कुटुंबांपर्यंत मदतीची रक्कम पोहोचणे सोपे होईल.

हा संपूर्ण कार्यक्रम ऑनलाईन असेल आणि पीडितांच्या कुटुंबियांना कागदपत्रांसाठी इकडे-तिकडे भटकावे लागणार नाही. जे नगरपालिकेच्या क्षेत्रात राहत आहेत त्यांना संबंधित कौन्सिल किंवा नगरपालिकेकडून मदत रक्कम मिळेल. ग्रामीण भागात राहणाऱ्या कुटुंबांना जिल्हा परिषदांकडून मदत केली जाईल. प्रभावित कुटुंबांना अर्ज करण्यासाठी एक फॉर्म भरावा लागेल. त्याला मृत्यूचे प्रमाणपत्र जोडावे लागेल आणि ते संबंधित विभागाकडे सबमिट करावे लागेल.

मदतीची रक्कम अशा कुटुंबांनाही दिली जाईल ज्यांच्याकडे मृत्यूचे प्रमाणपत्र नाही. अशा परिस्थितीत, मृत व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा पुरावा द्यावा लागेल. महाराष्ट्रात कोरोनामुळे सुमारे 1.38 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. या  आकडेवारीनुसार, राज्य सरकारला मदतीसाठी सुमारे 700 कोटी रुपये खर्च करावे लागतील. गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला अशा कोरोना पीडितांच्या कुटुंबीयांना किमान 50 हजार रुपयांची मदत देण्याचे निर्देश दिले होते. यासंदर्भात केंद्राने तयार केलेली मार्गदर्शक तत्त्वेही न्यायालयाने मंजूर केली. (हेही वाचा: Mumbai: मुंबईमध्ये लसीकरणाला वेग, 42 लाखांहून अधिक लोकांना मिळाले दोन्ही डोस- BMC)

या मॅन्युअल अंतर्गत, अशा कुटुंबांना मदत दिली जाणर आहे ज्यांच्या घरातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्याचा 30 दिवसांच्या आत मृत्यू झाला आहे. यामध्ये अशा बाधित कुटुंबांनाही मदत दिली जाईल जिथे कोरोना पीडित व्यक्तीने आत्महत्या केली आहे.