पुणे महापालिका निवडणुकीत (Pune Municipal Corporation Election) भाजपसोबत युती (MNS-BJP Alliance ) करण्यास मनसे (MNS) नेते इच्छुक असल्याचची चर्चा आहे. भाजपा सोबत युती करायची किंवा नाही याबाबत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे पुणे मनसे पदाधिकारी काहीसे 'वेट अँड वॉच' मोडवरती असल्याचे समजते. पुण्यातील राजकीय वर्तुळातील माहितीनुसार आगामी महापालिका निवडणुकीत भाजपसोबत युती करावी असा स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या एका गटाचा अग्रह आहे. मात्र, सध्या तरी भाजपसोबत युतीच्या चर्चा करु नका, अशा सूचना राज ठाकरे यांच्याकडून मिळाल्याने सध्या तरी मनसे-भाजप युतीचा मुद्दा निकाली निघाला आहे, अशी चर्चा आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच नाशिक आणि पुणे जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी पक्षाचे पदाधिकारी आणि काही प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा केली. या वेळी पुणे मनसेतील एक गट आगामी काळात महापालिका निवडणूक भाजप सोबतयुती करुन लढल्यास पक्षाला त्याचा चांगला फायदा होईल, असे आग्रह धरला. दरम्यान, कार्यकर्त्यांची भूमिका कानावर घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी सावध भूमिका घेतली. तसेच, युती करण्याबाबत कोणताही निर्णय दिला नाही. (हेही वाचा, Raj Thackeray in Nashik: शरियतसारखा कायदा आणा, महिलांवरील अत्याचार थांबतील - राज ठाकरे)
पालघर जिल्ह्यात मात्र मनसे भाजप युती झाली आहे. इथल्या पोटनिवडणुकीत दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. पालघर जिल्हा परिषद, पंचायत समिती यांमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीत हे दोन्ही पक्ष युती करुन एकत्र लढणार आहेत. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात मनसे -भाजप अशी युती पाहायला मिळणार आहे. पालघर भाजप अध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी याबाबत घोषणा केली आहे.
पुणे महापालिकेतील पक्षीय बलाबल
भाजप – 99, राष्ट्रवादी – 42,काँग्रेस – 10 ,शिवसेना – 10, मनसे – 2, एमआयएम – 1, एकूण जागा – 164
दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांच्यात काही दिवसांपूर्वीच भेट झाली होती. ही भेट राजकीय नव्हती असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. मात्र तरीही या दोन्ही नेत्यांतील भेटीचा राजकीय अर्थ काढला जात आहे. नंतर मात्र आमच्यात राजकीय चर्चा झाल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. मात्र, जेव्हा दोन प्रमुख राजकीय नेते जेव्हा एकमेकांना भेटत असतात तेव्हा त्या भेटीत राजकीय चर्चा होतच असते. ती सामान्य बाब असल्याची पुस्तीही पाटील यांनी जोडली.