PMC Election 2022: पुण्याचा आगामी महापौर शिवसेनेचाच झाला पाहिजे, संजय राऊत यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना
Sanjay Raut | (Photo Credits: Facebook)

पुण्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या (Pune Municipal Corporation Election 2022) पार्श्वभूभीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पुणे महानगरपालिकेत आपल्या पक्षाचा ठसा उमटवण्यासठी अनेक पक्ष तयारीला लागले आहेत. याचदरम्यान, शिवसेनेकडून (Shiv Sena) शिरुर लोकसभा आणि पिंपरी, चिंचवड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा महापौर झाला पाहिजे, अशा सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

दरम्यान, या मेळाव्यात संजय राऊत यांनी म्हटले की, ठाण्यात शिवसेनेचा महापौर आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. मात्र, पुणे, पिंपरी - चिंचवडमध्ये अस्तित्वासाठी संघर्ष करायला लागतोय, हे चित्र चांगले नाही. पक्ष कमी पडला, पक्ष बांधणी झाली नाही, असे म्हणणे योग्य नाही. पुण्यात शिवेसनेनेचे 10 नगरसेवक नाहीत. पुण्याच्या आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी आदित्य शिरोडकर आणि सचिन अहिर यांच्यावर सोपवली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीसोबत आघाडी झाली तर, चांगलेच आहे. नाहीतर आपले एकला चलो रे. तसेच पुणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा महापौर झाला पाहिजे, असे म्हणत संजय राऊत यांनी शिवसैनिकांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. हे देखील वाचा- Sanjay Raut Criticizes BJP: भाजप लोकांचे मनोरंजन करीत असताना सिनेमागृह उघडण्याची काय गरज? शिवसेना खासदार संजय राऊत यांचे वक्तव्य 

दरम्यान, शिवसेनेच्या या मेळाव्यात माजी आमदार रवींद्र मिर्लेकर, जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर, सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार श्रीरंग बारणे, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस डॉ. रघुनाथ कुचिक, राज्य संघटक गोविंद घोळवे, माजी आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार, शरद सोनवणे, सहसंपर्कप्रमुख योगेश बाबर, जिल्हाप्रमुख विजय देशमुख, शहरप्रमुख अ‍ॅड. सचिन भोसले, महिला आघाडीच्या जिल्हासंघटक सुलभा उबाळे उपस्थित होते.