Pune Municipal Corporation and ZP By Election Result 2019: पुणे महापालिका पोटनिवडणुक 2019: पुणे महापालिकेसाठी झालेल्या प्रभाग क्रमांक 1 अ मध्ये 7, प्रभाग क्रमांक 42 अ मध्ये 4 आणि ब मध्ये 3 या जागांसाठी झालेल्या पोटनिवडुकीचा निकाल हाती आला आहे. या निकालानुसार प्रभाग क्रमांक 1 मधून भाजपच्या ऐश्वर्या जाथव यांनी बाजी मारली. त्यांना तीन हजारांहून अधिक मते मिळाली. भाजप नगरसेवक किरण जठार यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याने या प्रभागात पोटनिवडणूक झाली.
पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या प्रभाग क्रमांक 42 लोहगाव-फुरसुंगी येथे एकूण दोन जांसाठी निवडणूक पारपडली. या दोन जागांपैकी एका ठिकाणी प्रत्येकी एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस, आणि भाजप विजयी झाले. प्रभाग क्रमांक 42 (अ) मधून राष्ट्रवादीचे गणेश ढोरे तर प्रभाग क्रमांक 42 (ब) मधून भाजपच्या अश्विनी पोकळे विजयी झाल्या. दोन्ही उमेदवारांना अनुक्रमे चार हजार आणि 942 इतके मताधिक्य मिळाले.
दरम्यान, पुण्यात इंदापूर बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद पोटनिवडणूक पार पडली. या निवडणुकीत काँग्रेस नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी बहुमताने बाजी मारली. हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. या जागेवरुन अंकिता पाटिल यांना 17 हजार 274 मतांनी विजय प्राप्त झाला. या जागेसाठी 23 जून रोजी मतदान पार पडले होते.
महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज (सोमवार, 24 जून 2019 रोजी पार पडली. अर्थात पोटनिवडणुका लागलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची संख्या अधिक नसली तरी, आगामी विधानसभा निवडणूक 2019 साठीची लिटमस टेस्ट म्हणून या निवडणुका ओळखल्या जातात. या पार्श्वभूमिवर या निवडणुकांना महत्त्व प्राप्त होते. या निवडणुकांच्या निकालावर नजर टाकता संमिश्र निकाल हाती येतो.