पुणे मेट्रो प्रोजेक्ट हा शहराचा चेहरामोहरा बदलून पुण्याला एक नवं रूप देणार आहे. या प्रोजेक्टमध्ये 5 किलोमीटरचा भुयारी मार्ग असून तोच 28 मीटर जमिनीच्या खाली असणार आहे. आणि विशेष म्हणजे या भुयारी मार्गामध्ये 5 मेट्रोची स्थानके असणार आहेत. ही स्थानके दुमजली असून त्यांची लांबी 150 मीटरपेक्षाही जास्त असेल तर रुंदी २५ मीटर असणार आहे.
या भुयारी मार्गाचे खोदकाम डिसेंबर महिन्यापासून सुरु होणार असून ते पूर्ण होण्यास 2 वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
वनाज ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट अशा 31 किलोमीटरच्या मेट्रोच्या मार्गापैकी कृषी विद्यालय ते स्वारगेट हा संपूर्ण भुयारी मार्ग असणार आहे. 28 मीटर जमिनीखालून ही मेट्रो धावणार असून त्यासाठी किमान 30 मीटर खोलाचा खड्डा खणणे आवश्यक आहे. तसेच या भोगद्यामध्ये 5 किलोमीटर लांबीच्या 2 ट्यूब तयार करण्यात येणार आहेत. एक ट्यूब जाणाऱ्या मेट्रोसाठी तर एक येणाऱ्या असेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रो 3 चं भूमिपूजन
शिवाजीनगर एसटी स्थानकाच्या जागेत, सिव्हिल कोर्टाच्या जवळ, मंडईत झुणका भाकर केंद्र असणारी जागा अशा तीन ठिकाणांवर भुयारी मार्गाचे काम सुरु देखील करण्यात आले आहे. कसबा पेठेतील जागा मिळवण्यात अडचण येत असल्याने आता तेथील मेट्रो स्थानक महापालिकेच्या दादोजी कोंडदेव या शाळेच्या जागेवर बनवण्यात येणार आहे.