Pune Crime: गुंड शरद मोहोळ च्या पत्नीला धमकवणारा  मार्शल लुईस लीलाकर पुण्याच्या ससून हॉस्पिटल मधून पळाला
Crime (PC- File Image)

महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था कोलमडल्याचे आरोप विरोधक करत असताना आता त्यामध्ये अजून एका घटनेची भर पडली आहे. कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) याच्या पत्नीला धमकवणारा आरोपी मार्शल लुईस लीलाकर (Marshal Lewis Leelakar) पुण्याच्या ससून हॉस्पिटल (Sassoon Hospital) मधून पळाला आहे. पोलिसांना गुंगारा देत मार्शल लुईस लीलाकर पळून गेल्याने पुणे शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. मार्शल ला दोन दिवसांपूर्वीच पोलिसांनी अटक केली होती.

दोन दिवसांपूर्वी मार्शल याने शरद मोहोळच्या पत्नीला सोशल मीडीयात रिल्स आणि कमेंट द्वारा धमकावत होता. त्यावरून पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली होती. पुण्यात येरवडा जेल मध्ये मार्शल होता. पण दोन दिवसातच प्रकृती बिघडल्याने छातीत दुखत असल्याच्या तक्रारीवरून त्याला ससून हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. पण हॉस्पिटल मधून तो फरार झाल्याचं वृत्त आता समोर आलं आहे. सध्या मार्शलला शोधण्यासाठी 8 पथकं पाठवण्यात आली असून पोलिस त्याच्या मागावर आहेत.

मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी त्यांनी त्यांच्या जीवाला धोका असल्याचे देखील सांगितले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर मार्शल लुईस लीलाकर याला अटक करण्यात आली होती. सध्या बंडगार्डन पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल आहे.