पुणे (Pune By-Election Results 2023) जिल्ह्यातील कसबापेठ (Kasba Peth Assembly By-Election Results 2023) आणि चिंचवड (Chinchwad Assembly By-Election Results 2023) या दोन विधानसभा मतदारसंघात पार पडलेल्या निवडणुकीच्या मतदानाची मतमोजणी आज (2 मार्च) पार पडत आहे. कसबापेठ आणि चिंचवड या दोन्ही ठिकाणी अनुक्रमे मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप हे भाजपचे विद्यमान आमदार होते. दरम्यान, यादोन्ही आमदारांच्या अकाली निधनामुळे या ठिकणी पोटनिवडणूक लागली. ही निवडणूक अत्यंत घासून झाली. मतदारसंघावरील वर्चस्व कायम ठेवण्यासाठी भाजपने जंग जंग पछाडले. तर काही करुन हा मतदारसंघ खेचून घ्याचचा यासाठी महाविकासआघाडीने जीवाचे रान केले. त्यामुळे या निवडणुकीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. या मतमोजणीचा निकाल आपण एबीपी माझा लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे (Pune Kasba Peth, Chinchwad Assembly By-Election Results 2023 Live Streaming) येथे पाहू शकता.
कसबापेठ येथून महाविकासआघाडीच्या वतीने काँग्रेसचे रविंद्र धंगेकर आणि भाजपच्या वतीने हेमंत रासने हे प्रमुख उमेदवार मैदानात आहेत. नाही म्हणायला आनंद दवे आणि अभिजित बिचूकले सुद्धा इथे मैदानात उतरले आहेत. तर चिंचवड येथून थेट तिरंगी लढत होत आहे. या ठिकाणी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप भाजपकडून मैदानात आहे. महाविकासाघाडीच्या वतीने राष्ट्रवादीचे नाना काटे तर अपक्ष म्हणून राहुल कलाटे मैदानात आहेत. सर्वच उमेदवार परस्परांना तुल्यबळ आहेत. त्यामुळे सामना अतिशय रंजक ठरला आहे. आता मतदारांच्या मनात काय आहे हा आजच्या मतमोजनीतूनच पुढे येणार आहे.
एबीपी माझा लाईव्ह स्ट्रीमिंग
कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधक असे सर्वच जोरदार कामाला लागले होते. सत्ताधारी गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले होते. शिवाय एकनाथ शिंदे गटाचे जवळपास सर्वच आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि इतर मंत्रीही प्रचारासाठी रिंगणात होते. महाविकासआघाडीकडून उद्धव ठाकरे (ऑनलाईन), अजित पवार, आदित्य ठाकरे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, सुनील केदार यांच्यासह सर्व नेते मैदानात होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार हे सुद्धा शेवटच्याक्षणी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले.