पुणे: दिवे घाटात वारकर्‍यांच्या दिंडीला अपघात; संत नामदेव यांचे 17 वे वंशज सोपान महाराज नामदास यांंच्यासह एकाचा मृत्यू; 15 जखमी
Accident | File Image

दिवे घाटामध्ये वारकर्‍यांच्या दिंडीला आज (19 नोव्हेंबर) अपघात झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार जेसीबीवरील नियंत्रण सुटल्याने तो थेट वारकर्‍यांच्या दिंडींमध्ये घुसला आणि अचानक झालेल्या या विचित्र अपघातामध्ये दोघांचा नाहक बळी गेला आहे. तर सुमारे 15 वारकरी जखमी झाल्याची माहिती आता समोर आली आहे. जखमींवर हडपसर येथील नोबेल रूग्णालयामध्ये उपचार सुरू असून एकाची प्रकृती गंभीर असल्याचं वृत्त समोर आलं आहे. आज सकाळी 9 च्या सुमारास हा अपघात झाला असून मृतांपैकी एक हे संत नामदेव यांचे 17 वे वंशज असल्याचे मीडीया रिपोर्टमधून समोर आलं आहे.

संत नामदेव पालखी सोहळ्याचं औचित्य साधत दरवर्षीप्रमाणे यंदाही वारकरी दिंडी घेऊन निघाले आहेत. यामध्ये पंढरपूर ते आळंदी असा प्रवास करणारी दिंडी आज सासवड मध्ये होती. दिवे घाटातून मार्गस्थ होताना आज सकाळी अचानक हा दुर्दैवी अपघात घडल्याने सार्‍यांचे मन सुन्न झाले आहे.

दिवे घाटात झालेल्या या अपघातामध्ये मृतांपैकी एक संत नामदेव यांचे 17 वे वंशज सोपान महाराज नामदास (36 वर्ष) तर अतुल आळशी यांचा समावेश आहे. यंदा 25 नोव्हेंबरला संत ज्ञानेश्वरांचा समाधी सोहळा रंगणार आहे. त्यासाठी ही दिंडी आळंदीच्या दिशेने निघाली आहे.