विद्याचे माहेरघर, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्यामधून बलात्काराची एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुणे रेल्वे स्टेशन परिसरातून एका 14 वर्षीय मुलीचे कथित अपहरण करण्यात आले आणि शहरातील अनेक ठिकाणी तिच्यावर दोन दिवस बलात्कार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. या गुन्ह्यात सहा ऑटोरिक्षा चालक आणि रेल्वेच्या दोन कर्मचाऱ्यांसह आठ जणांना अटक करण्यात आली आहे. वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दीपक लगड यांनी सांगितले की, मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती, त्याआधारे मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला गेला.
रविवारी मुलीचा शोध घेतला गेला. मुलीने पोलिसांना सांगितले की तिचे अपहरण करण्यात आले आणि तिच्यावर बलात्कार करण्यात आला. लगड यांनी सांगितले की, मुलीचे कुटुंब मुलाचे बिहारचे आहे व तिचे वडील पुण्यात एक ठिकाणी माळीकाम करतात. 31 ऑगस्ट रोजी मुलगी घरात कोणाला न सांगता बिहारच्या मित्राला भेटायला जाण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशनवर आली. हा मित्र बिहारवरून मुंबईला येणार होता. मात्र पैसे नसल्याने ती स्टेशन परिसरात बराच काळ फिरत होती. त्यावेळी आरोपी ऑटोरिक्षा चालकाने मुलीला पाहिले आणि त्याच्या लक्षात आले की, मुलगी एकटी आहे.
त्यानंतर त्यांनी तिला ट्रेनबाबत खोटी माहिती सांगून, दुसऱ्या दिवशीची ट्रेन घेण्यास भाग पाडले. तिच्या रात्रीच्या निवासाची व्यवस्था करण्याचे आश्वासन देऊन त्यांनी तिला आपल्या सोबत चलण्यास सांगितले. त्यानंतर रिक्षाचालकांनी शहरातील अनेक ठिकाणी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. आता भारतीय दंड संहिता आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑटोरिक्षा चालक आणि रेल्वेचे दोन चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसह आठही आरोपींना अटक करण्यात आली. याबाबत पुढील तपास सुरू आहे. (हेही वाचा: Mumbai Shocker: जेलमधून सुटताच 2 दिवसांत जावयाने काढला सासूचा काटा; शुल्लक कारणावरुन केली हत्या)
दरम्यान, नुकतेच पुण्यात 40 वर्षांच्या वडिलांनी आपल्या 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले आहे की आरोपी एक कुख्यात गुन्हेगार आहे आणि त्याच्यावर दरोड्याचा गुन्हाही दाखल आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पत्नी आणि मुलीसोबत राहत होता.