पुणे येथे झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मृतांचा आकडा 23 वर पोहचला, 8 जण अद्याप बेपत्ता
(फोटो क्रेडीट: twitter / @MeisterSuraj )

पुणे (Pune) येथे   25 सप्टेंबरला झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये अनेकांचे नुकसान झाले असून घराच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी गेल्याचे दिसून आले. तसेच अनेक गाड्यांचेसुद्धा नुकसान झाले असून पुरामुळे काही गाड्या वाहून सुद्धा गेल्या आहेत. तर पुरात  वाहून गेलेल्या मृतांचा आकडा 23 वर पोहचला असून अद्याप 8 जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. पुण्यात प्रथमच एवढा मुसळधार पाऊस पडला असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. त्याचसोबत येथील परिस्थिती जरी पूर्ववत होत असली तरीही नागरिकांच्या डोळ्यात पाणी दिसून येत आहे.

शहरात पडलेल्या अतिमुसळधार पावसामुळे गाड्यांचे नुकसान झाले. याच स्थितीत नऱ्हे येथील गाड्यांच्या पार्किंग ठिकाणी पावसाचे पाणी साचले असल्याने ते कमी करण्यासाठी मुकेश गाडीलोहार हा तरुण वाहून गेला. तर मुकेश याचा मृतदेह अथेक जांभूळवाडी तलावात सापडला. त्याचसोबत कार मधून तीन जण वाहून गेलेल्यांचा सुद्धा मृतदेस अग्निशमन दलाच्या जवानांच्या हाती लागला आहे.

पुरात वाहून गेलेल्या नागरिकांना शोधून काढण्यासाठी अग्निशमन दलाकडून शोधमोहिम राबवली होती. या मोहिमेअंतर्गत पुण्यातील विविध ठिकाणाहून वाहून गेलेल्यांना बाहेर काढण्यात आले असून आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र अद्याप 8 जण बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे.(पुणे येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे 18 जणांचा बळी)

तर आंबिल ओढाला आलेल्या पुरामुळे भिंत कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. पुण्यातील या सर्व प्रकारानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. परंतु तेव्हा स्थानिक नागरिकांना चंद्रकांत पाटील यांच्या निषेधार्थ घोषणा देण्यास सुरुवात करत ते फक्त येथे फोटो काढण्यासाठी आले असल्याचा संताप व्यक्त करण्यात आला. तर अतिवृष्टी झालेल्या दिवशीच रात्री महापालिका प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आवश्यक प्रतिसाद न मिळाल्याने ही परिस्थिती ओढावल्याने नागरिकांमध्ये अधिक रोष निर्माण झाला आहे.