पुणे येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे 18 जणांचा बळी; शाळा-महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर
Monsoon 2019 (Photo Credits: PTI)

पुणे (Pune) येथे गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे तेथील नागरिकांसह गाड्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. याच परिस्थितीत पुणेसह बारामती, हवेली, पुरंदर आणि भोर येथील आज (27 सप्टेंबर) शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच पुरामुळे वाहून गेलेल्या मृतांचा आकडा आता 18 वर गेला आहे. याबाबत पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर यांनी अधिक माहिती दिली आहे.

बुधवारी रात्री फक्त चार तास झालेल्या मुसळधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली. यामध्ये अनेकांचे नुकसान झाले असून इमारतीच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी शिरल्याचे चित्र सध्या तेथे निर्माण झाले आहे. तर पुणे येथे 100mm पावसाची नोंद करण्यात आली असून यामध्ये 18 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचसोबत घराच्या भिंती कोसळून आणि वाहून गेल्यामुळे काही जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका 800 जनावरांना बसला असून त्यांचा सुद्धा यामध्ये मृत्यू झाला आहे. जवळजवळ 2 हजार रस्त्यालगतच्या गाड्या पाणी साचलेल्या ठिकाणी आळढून आल्या आहेत. दक्षिण पुण्यातील कातरज, भिबेवाडी, पद्मावती आणि सहकारनगर येथे या गाड्या पुरामुळे वाहून आल्या आहेत.(पुणे ढगफुटी नंतर अतिवृष्टीत दगावलेल्यांच्या संख्येत वाढ; बारामती मध्ये 14,000 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थालांतर)

महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी असे म्हटले आहे की, अंबिली ओढा येथे उभारण्यात आलेल्या बांधकाम ठिकाणी मुसळधार पावसामुळे त्याचा प्रवाह अतिवेगाने वाहू लागल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.आतापर्यंत पुण्यात प्रथमच एवढी पुराची स्थिती निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे. तर गुरुवारपासून पुरामुळे वाहून आलेला कचरा योग्य ठिकणी स्थलांतर करण्यात येत आहे. तर 27 सप्टेंबरपासून पावसाचा जोर कमी होणार असल्याचे हवामान खात्याचे मुख्याधिकारी अनुपम कश्यप यांनी म्हटले आहे.

तर दांडेकप पुलाच्या येथील मुख्य जलवाहिनी वाहून गेल्याने शहाराचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न उद्भवला होता. त्यामुळे आज नवी पेठ, राजेंद्रनगर, डेक्कन, पुलाची वाडी, प्रभात रस्ता परिसराचा पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचसोबत सहकारनगर, बिबवेवाडी, कोंढावा, मार्केट यार्ड या ठिकाणी पुढील 2-3 दिवस कमी दाबाने पाण्याचा पुरवठा नागरिकांना केला जाणार आहे.