Coronavirus प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: PTI)

महाराष्ट्रामध्ये मुंबईसह पुणे (Pune) विभागातील कोरोना विषाणू (Coronavirus) रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर असे 5 जिल्हे पुणे विभागात आहेत. सध्या जवळजवळ सर्वच जिल्ह्यांची आरोग्य सेवेच्या बाबतीत परिस्थिती बिकट होत चालली आहे. शासनाने सरकारी तसेच खासगी रुग्णालयातील अनेक बेड्स खास कोरोना विषाणू रुग्णांसाठी राखीव ठेवले आहेत. मात्र सद्य परिस्थितीमध्ये रुग्णांना नेमक्या कोणत्या रुग्णालयात किती बेड्स उपलब्ध आहेत याबाबत काहीच माहिती नाही. हीच समस्या ओळखून आता विभागीय आयुक्त, पुणे यांनी हॉस्पिटलनुसार बेड उपलब्धता डॅशबोर्ड (Hospital Wise Bed Availability Dashboard) तयार केला आहे.

कोरोना संसर्गाच्या घटना वाढत असल्याने मोठ्या प्रमाणावर रुग्णांना रुग्णालयात दाखल केले जाण्याचे प्रमाणही वाढत आहे. अशावेळी नक्की कोणत्या रुग्णालयात बेड उपलब्ध आहेत, कोणत्या रुग्णालयात आयसोलेशन ऑक्सिजन बेड उपलब्ध आहे किंवा कोणत्या रुग्णालयात व्हेंटीलेटर, आयसीयू बेड्स उपलब्ध आहेत याबाबत लोकांना काहीच माहिती नसते. म्हणूनच या सर्व गोष्टींची माहिती देणारा डॅशबोर्ड सादर केला गेला आहे. यामध्ये पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांमधील कोरोना बेड्सची सर्व माहिती दिली गेली आहे.

या डॅशबोर्डवरील माहिती स्वत: रुग्णालयांनी भरलेल्या डेटाच्या आधारावर आहे. या डॅशबोर्डमध्ये सद्य परिस्थितीनुसार अपडेट्स पहायला मिळतील. यामध्ये पुणे जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांची संपूर्ण माहिती दिली गेली आहे. यामुळे वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाच्या कुटुंबास या यादीनुसार जवळच्या रुग्णालयात दाखल केले जाऊ शकेल. या डॅशबोर्डवर आपातकालीन संपर्क तपशीलदेखील आहे, ज्यामध्ये पुणे जि.प. नियंत्रण कक्ष, पीएमसी कंट्रोल रूम, पीसीएमसी कंट्रोल रूम, कोल्हापूर कंट्रोल रूम, सांगली कंट्रोल रूम, सोलापूर कंट्रोल रूम व सातारा कंट्रोल रूम यांचे नंबर्स दिले गेले आहेत. (हेही वाचा: COVID19 वरील लसीच्या डोसचा तुडवडा पडल्याने मुंबईतील लसीकरण थांबणार, महापौर किशोरी पेडणेकर यांची माहिती)

दरम्यान, पुणे शहरात आज नव्याने 7, 010 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, पुणे शहरातील एकूण संख्या आता 3,12,382 इतकी झाली आहे.