Cyber Crime | Representational Image (Photo Credits: Pixabay)

ऑनलाईन (Online Buying and Selling) पद्धतीने गृहउपयोगी वस्तू खरेदी विक्री करणाऱ्या एका वेबसाईटवरुन व्यवहार करणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. पीडित महिला पुणे येथील आहे. तिला सायबर गुन्हेगाराने (Pune Cyber Crime) केवळ स्क्रिनशॉटच्या माध्यमातून तबबल 7.65 लाख रुपयांना गंडा घातला आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने थेट पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दिली. हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) महिलेची तक्रार नोंदवून घेत एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक माहितीनुसार आदिल शेख असे आरोपीचे नाव असल्याचे समजते.

पीडित महिला ही पुणे येथील हडपसर परिसरात राहते. तिला आपल्या घरातील एक जुने कपाट विकायचे होते. त्यासाठी तिने गृहउपयोगी वस्तू ऑनलाईन खरेदी-विक्री करणाऱ्या एका साईटवर जाहीरात दिली. ती जाहीरात पाहून एका अनोळखी व्यक्तीने तिच्याशी संपर्क साधला. दोघांनी आपापले फोन नंबर एकमेकांना दिले घेतले. त्यांच्या कपाटावरुन व्यवहार सुरु झाला. कपाटाची रक्कम ठरली. दरम्यान, आरोपीने महिलेच्या फोनवर पैसे पाठवल्याचा स्क्रिनशॉट पाठवला. स्क्रिनशॉटवर पाठवलेली रक्कम 8 लाख रुपये इतकी दिसत होती. समोरुन आरोपीचा काहीच क्षणात फोन आला. चुकून आपल्याकडून आपल्या खात्यावर 8 लाख रुपये पाठवले गेले आहेत. कृपा करुन कपाटाची रक्कम कमी करुन उर्वरीत रक्कम मला परत करा. (हेही वाचा, Cyber Fraud Pune Case: 400 रूपयांचा केक ऑनलाईन ऑर्डर करणं पडलं महागात; 1.67 लाखांची आर्थिक फसवणूक)

पीडितेने आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. आरोपीने पाठवलेल्या स्क्रिनशॉटची कोणत्याही प्रकारे शहानिशा केली नाही. केवळ निष्काळजीपणा दाखवत कपाटाची रक्कम कमी करुन आरोपीच्या बँक खात्यावर तब्बल 7.65 लाख रुपयांची रक्कम वळती केली. धक्कादायक म्हणजे आरोपीने पाठवलेला स्क्रीनशॉट पूर्णपणे खोटा आणि मॉर्फ केलेला होता. काही काळाने पीडितेने आपले बँक खाते तपासले. त्यावरील शिल्लख रक्कमही पाहिली. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे पीडितेच्या लक्षात आले. त्यानंतर पीडिता प्रचंड घाबरली. तिने तातडीने हडपसर पोलिसांमध्ये दाखल होत आरोपीविरोधात तक्रार दिली. हडपसर पोलिसांनी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला. तसेच, स्क्रिनशॉट पाठवलेल्या व्यक्तीचा शोध सुरु केला. दरम्यान, स्क्रिनशॉट ज्या फोन क्रमांकावरुन आला तो फोन क्रमांक आदिल शेख नामक व्यक्ती वापरत असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.