Pune Crime: हडपसर येथून चार महिन्यांच्या बाळाला पळवून नेणाऱ्या महिलेला अटक; बाळ आईकडे स्वाधीन
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Unsplash)

हडपसर (Hadapsar) येथून चार महिन्यांच्या बाळाला पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना दोन दिवासांपूर्वी घडली होती. फिर्यादी महिलेच्या तक्रारीनंतर पुणे पोलिसांनी (Pune Police) आरोपी महिलेला काही तासांतच अटक केली आहे. तसेच चार महिन्याच्या चिमुकलीला तिच्या आईकडे सुखरूप स्वाधीन करण्यात आले आहे. एस.टी मधून अहमदनगरहून साताऱ्याकडे जात असाताना फिर्यादी महिलेची आरोपी महिलेशी ओळख झाली होती. याचदरम्यान, आरोपी महिलेने नजर चुकवत बाळाला पळवून नेले होते, अशी माहिती लोकसत्ताने आपल्या वृत्तात दिली आहे.

मंजू देविदास मोरे असे फिर्यादी महिलेचे नाव असून त्या अहमदनगरच्या लोणी येथील रहिवाशी आहेत. मंजू यांचे आपल्या पतीसोबत मंगळवारी भांडण झाले होते. त्यानंतर मंजू यांनी आपल्या चार महिन्याच्या मुलीसोबत सातारा येथे गावी जाण्याचा निर्णय घेतला. अहमदनगरवरुन त्या साताऱ्याकडे जाणार्‍या एसटीमध्ये बसल्या. या प्रवासादरम्यान मंजू यांची एका महिलेशी ओळख झाली. दरम्यान, संबंधित महिलेनेही बोलण्यामधून मंजू यांचा विश्वास संपादन केला. दरम्यान, हडपसर भागात दोघी महिला एका चायनिज हॉलेटमध्ये जेवायला गेल्या होत्या. त्यावेळी मंजू यांनी आपल्या बाळाला थोड्यावेळासाठी आरोपी महिलेकडे सोपवले. यातच आरोपी महिलेने मंजू यांची नजर चुकवत त्या ठिकाणावरुन पोबारा केला. हे देखील वाचा- Thane: चारित्र्याच्या संशायवरुन बायकोची हत्या, नवऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

परंतु, आपल्या बाळाला घेऊन गेलेली महिला बराच वेळ झाला तरी दिसली नाही, म्हणून मंजू यांनी शोध सुरु केला. त्यावेळी संबंधित महिला आसपास दिसत नसल्याने मंजू यांनी पुणे पोलिसांत तक्रार दाखल केली. मंजू यांच्या तक्रारीनंतर पुणे पोलिसांनी आरोपी महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याचदरम्यान मांजरी येथील परिसरात एका महिलेकडे बाळ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला महिलेला अटक केली. तसेच तिच्या जवळचे बाळ, फिर्यादी महिलेकडे सुपूर्द करण्यात आले आहे. याप्रकरणी पुणे पोलीस आरोपी महिलेच्या नावावर आणखी काही गुन्ह्यांची नोंद आहे का? याचाही शोध घेत आहेत.