Pune: पुण्यात Containment Zone सोडून इतर ठिकाणी अत्यावश्यक सेवेत न येणारी दुकाने, पेट्रोल पंप सुरु करण्यास परवानगी; जाणून घ्या वेळा
Image For Representation (Photo Credits: IANS)

देशात कोरोना व्हायरस लॉकडाऊनची (Coronavirus Lockdown) तिसरी फेज सुरु झाल्यावर अनेक नियमांमध्ये बदल केले गेले. केंद्र सरकारसह राज्य सरकारनेही आपल्या राज्यांमधील कोरोना व्हायरसच्या परिस्थितीनुसार जुन्या नियमांमध्ये बदल केले आहेत. त्यानुसार पुणे जिल्ह्या (Pune District) साठीचे काही नियम, पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड (Shekhar Gaikwad) यांनी जाहीर केले आहेत. यामध्ये मुख्यत्वे दुकानांच्या वेळा आणि पेट्रोल पंपाबाबत माहिती देण्यात आली आहे. पुणे विभागातील 673 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. विभागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 हजार 574  इतकी झाली आहे. ही संख्या वाढत असल्याने खबरदारीचे उपाय योजले आहेत.

पुणे शहराचे प्रतिबंधित क्षेत्र (Containment Zone) प्रतिबंधित क्षेत्राबाहेर (Outside Containment Zone) अशा दोन क्षेत्रात विभागणी करण्यात आली आहे. शेखर गायकवाड, आयुक्त, पुणे महानगरपालिका, यांनी निश्चित केलेल्या नियमांनुसार, आज बुधवार दि. 06 मे 2020 पासून ते 17 मे 2020 पर्यंत, 69 प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये केवळ आपत्कालीन सेवा व जीवनावश्यक वस्तूंच्या सेवा व पुरवठा सुरु राहणार आहे. याठिकाणी कोणत्याही बिगर अत्यावश्यक सेवा/वस्तूंचा पुरवठा करणारे व्यवसाय सुरु राहणार नाहीत. तसेच आपत्कालीन सेवा व जीवनावश्यक वस्तूंच्या सेवा व पुरवठा सुरळीत राहण्याकरिता असलेली दुकाने सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत उघडी राहतील.

प्रतिबंधित क्षेत्रा बाहेरील उर्वरित मनपा क्षेत्रामध्ये एकल (स्वतंत्र) दुकान, रहिवाशी कॉलनीतील दुकाने, रहिवाशी संकुलातील दुकाने आणि गल्ली/रस्त्यालगतची दुकाने सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत खुली ठेवण्याची परवानगी राहील.

बिगर अत्यावश्यक सेवा/वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी आठवड्याच्या सातही दिवसांमध्ये विविध व्यवसाय सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक साधने, संगणक, मोबाईलची दुकाने, भांड्यांची दुकाने, कपड्यांची दिकाने, वाहन दुरुस्ती, प्लंबिंग, बांधकाम साहित्य अशा गोष्टींचा समावेश आहे. (हेही वाचा: Coronavirus Update: महाराष्ट्रातील नागरिकांना मोठा दिलासा; राज्यात गेल्या दोन दिवसात 700 रुग्ण कोरोनामुक्त)

दुसरीकडे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे, खडकी व देहूरोड छावनी परिषद, नगरपरिषद, नगरपालिका, नगरपंचायत व पुणे ग्रामीण क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर सर्व ठिकाणी पेट्रोल/डिझेल पंपचालकांनी येणा-या सर्व वाहनांना पास/ओळखपत्राची मागणी न करता सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेमध्ये पेट्रोल/डिझेलचा पुरवठा करण्याय यावा असा आदेश दिला आहे. राष्ट्रीय महामार्गावरिल पेट्रोल/डिझेल शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या विहित वेळेमध्ये सुरू राहणार आहेत.