महाराष्ट्रात वाढत्या कोरोना विषाणू (Coronavirus) प्रकरणांनी सरकारची चिंता वाढविली आहे. अचानक कोरोना रूग्ण वाढल्यामुळे सध्या राज्यात प्रचंड गोंधळ उडाला आहे. सरकारी रुग्णालयाने फुल्ल झाली आहे. कुठे ऑक्सिजनची कमतरता आहे, तर सध्या राज्यातील अनेक रुग्णालयांमध्ये रूग्णांसाठी बेड उपलब्ध नाही. महत्वाचे म्हणजे अशा परिस्थितीमध्ये एकाच बेडवर दोन रुग्णांवर उपचार सुरु आहे. ही परिस्थिती ओढावली आहे पुण्यातील (Pune) ससून रुग्णालयात (Sassoon General Hospital). या ठिकाणी रुग्ण संख्या इतकी वाढली आहे की, नवीन रुग्णांवर उपचार कसा करावा असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे.
पुण्याच्या सर्वात मोठे सरकारी रुग्णालय ससूनची परिस्थिती सध्या प्रचंड खराब आहे. याठिकाणी एकाच बेडवर दोन रूग्णांवर उपचार केले जात आहेत. जमिनीवर रूग्ण आहेत, स्ट्रेचरवर रूग्ण आहेत, खुर्च्यांवर रुग्ण आहेत. यामुळे रुग्णालयातील सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. रुग्ण उपचारांच्या प्रतीक्षेत आहे. सध्या या गोष्टीचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
दुसरीकडे मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या ससून रुग्णालयात निवासी डॉक्टर आज रात्रीपासून संपावर जाऊ शकतात. आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर जाण्याबाबत डॉक्टरांनी भाष्य केले आहे. संध्याकाळी रुग्णालय प्रशासनाबरोबर होत असलेल्या बैठकीनंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल. या रुग्णालयात बेडची संख्या तातडीने वाढवावी, तसेच इथे कर्मचारी संख्याही वाढवावी अशी डॉक्टरांची मागणी आहे. (हेही वाचा: Maharashtra: उपचार देऊ शकत नाहीत तर वडीलांना इंजेक्शन देऊन मृत्यू द्या, चंद्रपुरात मुलाची हाक)
पुण्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे सोबतच रुग्णालयांमध्ये बेडची कमतरता देखील त्याच प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख आणि ससून रुग्णालयाचे डीन डॉ मुरलीधर तांबे यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला की, कोविड रुग्णांसाठी ससून रुग्णालयात अतिरिक्त 300 बेड वाढविले जावेत. आता ससून रुग्णालयात कोरोना रूग्णांसाठी उपलब्ध बेडची संख्या 500 वरून 800 पर्यंत गेली आहे.