Pune Rains (Photo Credits: Twitter)

मुंबई पाठोपाठ पुणे शहरातही पुन्हा पावसाने धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. आज (ऑक्टोबर 9) सायंकाळी सहा वाजल्यापासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊसाने पुणे शहरात हजेरी लावली.

पुणे शहरातील अनेक सखोल भागांत पाणी साचायला सुरुवात झाली आहे. तसेच अनेक ठिकाणी अजूनही ढगांचा गडगडाट कायम असल्याने पुढील काही तास जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पुण्यातील सहकार नगर विभागातील रस्त्यांवर पाणी साचल्याने कित्येक दुचाकी वाहने पूर्णपणे पाण्यात गेल्या आहेत. दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या जोरदार पावसाने याच विभागातील 5 जणांचा मृत्यू झाला होता.

पुण्यात अजून काही हानी होऊ नये म्हणून पुणेकरांनी शक्य असल्यास पाऊस थांबेपर्यंत व साचलेले पाणी ओसरेपर्यंत घरातच थांबावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

आज राज ठाकरे यांची विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची पहिली सभा पुण्यात होणार होती. परंतु पावसामुळे ही सभा ही रद्द करण्यात आली.