Water Cut | Representational & Edited Image (Photo Credits: Pixabay)

पुणे शहराला (Pune City) पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण (Khadkwasala Dam) साखळी प्रकल्पातील पाणीसाठ्यात झपाट्याने कमी होत आहे. यामुळे डिसेंबर महिन्यातच पुणेकरांवर पाणीकपातीचं संकट ओढवलं आहे. जलसंपदा विभागाच्या सूचनेनुसार पाण्याचा कमी वापर करण्यात येत असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. पुणे शहरात तूर्तास तरी पाणी कपातीचा निर्णय नाही, मात्र जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून पाणीकपातीबाबत निर्णय घेतला जाणार आहे. (हेही वाचा - Pune Water Storage: पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ 80 टक्के पाणीसाठा शिल्लक)

पुणे शहरातील पाणीकपातीबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. शहरातील पाणीकपातीबाबत लवकरच जलसंपदा विभागासोबत बैठक घेतली जाईल, असंही सांगण्यात आलं आहे. पुण्याला खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील 4 धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. शहराची तहान भागविण्यासाठी दररोज 1 हजार 650 दशलक्ष लीटर इतक्या पाण्याची गरज भासते. यंदा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी जलसंपदा विभागाने 12.60 अब्ज घनफूट एवढा पाणीसाठा मंजूर केला आहे.

खडकवासला प्रकल्पात 24.10 टीएमसी पाणीसाठा शिल्लक असला तरी त्यापैकी 8.54 टीएमसी पाणी रब्बी हंगामासाठी आरक्षित आहे. त्यामुळे शहरासाठी 15.50 टीएमसी एवढा पाणीसाठा असून जूनपर्यंत या पाण्याचे नियोजन महापालिकेला करावे लागणार आहे.