पुण्यातील चिंचवड येथील दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. भाजपाकडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली आहे. अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांच्या विरूद्ध मात्र महाविकास आघाडी लढताना त्यांच्यामध्ये बंडखोरी झाली आहे. महाविकास आघाडी कडून एनसीपीच्या नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण यामुळे राहुल कलाटे (Rahul Kalate) नाराज झाले आहेत. राहुल कलाटे यांचे नाव चर्चेत होते पण त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता पण राहुल कलाटे आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि त्यांनी अर्ज मागे घेण्यास नकार दिला.
राहुल कलाटे यांची मनधरणी करण्यासाठी एनसीपी आणि शिवसेना कडून प्रयत्न करण्यात आले होते पण त्यांना यश आले नाही. आज शिवसेनेकडून सचिन अहिर देखील पुण्यात दाखल झाले. त्यांनी राहुल यांची भेट घेतली पण ते देखील मनधरणी करण्यात यशस्वी ठरले नाहीत. दरम्यान राहुल कलाटे यांनी आपला निरोप अजित पवार यांच्यापर्यंतही नीट पोहचवला नाही असं म्हटलं आहे.
आज मीडीयाशी बोलताना राहुल कलाटे यांनी आपण निवडणूक लढवावी ही लोकांची इच्छा आहे. आपल्याला पुरेसा लोकांचा पाठिंबा आहे. मागील निवडणूकीतील लोकांचा प्रतिसाद पाहता विजयाचा विश्वास आहे असे त्यांनी बोलून दाखवले आहे. प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष पणे अनेकांनी मन वळवण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा अनादर करण्याचं माझ्या मनात नाही पण ही निवडणूक आपल्याला लढवायची आहे असे त्यांनी सांगितले आहे. नक्की वाचा: Chinchwad By-Election 2023: जागा काढायचीच! अजित पवार यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांचा खास माणूस मैदानात .
27 फेब्रुवारीला पुण्यात ही पोटनिवडणूक होणार आहे. चिंचवड सोबतच कसबा पेठ मध्येही निवडणूक होणार आहे. 2 मार्चला या निवडणूकीचा निकाल जाहीर होणार आहे.