Uddhav Thackeray, Ajit Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

कसबा विधानसभा मतदारसंघात लागलेल्या पोटनिवडणुकीत झालेली बंडखोरी रोखण्यात काँग्रेस आणि पर्यायाने महाविकासआघाडीला यश आले. पण, चिंचवड विधानसभा (Chinchwad By-Election 2023) मतदारसंघात मात्र मविआला अद्याप यश आले नाही. चिंचवडमध्ये मविआचे उमेदवार असलेल्या नाना काटे ( Nana Kate) यांच्या विरोधात राष्ट्रवादीतूनच बंडखोरी झाली आहे. राष्ट्रवादीचे राहुल कलाटे ( Rahul kalate ) अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. अजित पवार (Ajit Pawar) , प्रदेश राष्ट्रवादी या सर्वांनीच मनधरणीचे प्रयत्न करुनही कलाटे रिंगणात आहेत. त्यामुळे आता थेट उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) स्वत: मैदानात उतरले असून डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी उद्दव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आमदार सचिन अहिर संदेश घेऊन मैदानावर उतरले आहेत.

राहुल कलाटे (Rahul kalate) हे मुळचे शिवसेनेचे. मधल्या काळात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांनी केवळ पक्षात प्रवेशच केला नाही तर चिंचवड पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून थेट उमेदवारीवरच दावा सांगितला. महाविकासआघाडीच्या जागावाटपात ही जागा राष्ट्रवादीकडे गेली आहे. राष्ट्रवादीने येथून मविआच्या वतीने नाना काटे यांना रिंगणात उतरवले आहे. पण, राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने कलाटे यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी पूर्ण प्रयत्न केले. मात्र, त्याला यश येऊ शकले नाही. परिमामी आता उद्धव ठाकरे यांच्याकडे शब्द टाकण्यात आला आहे. (हेही वाचा, Rahul Gandhi: काँग्रेसच्या बंडखोराला राहुल गांधी यांचा फोन, एक घाव दोन तुकडे; झटक्यात उमेदवारी अर्जच मागे)

सचिन अहिर हे उद्धव ठाकरे यांचा संदेश घेऊन राहुल कलाटे यांना भेटणार आहेत. सचिन अहीर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, राहुल कलाटे हे शिवसेनेत होते. मधल्या काही काळात ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. आता त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे त्यांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी. यासाठी महाविकासआघाडी म्हणून शिवसेना शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणार आहे, असे अहिर म्हणाले.

भाजप आमदार लक्ष्मण जगताप ( Laxman Jagtap) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणूक लागली आहे. भाजपने या ठिकाणी दिवंगत लक्ष्मण जगताप ( Laxman Jagtap) यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे. जर राहुल कलाटे यांनी उमेदवारी मागे घेतली तर या ठिकाणी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा थेट सामना होणार आहे. त्यामुळे सामना दुरंगी करायचा की तिरंगी हे आता केवळ राहुल कलाटे यांच्याच हातात आहे.