Pune: पुण्यात बस चालक व वाहकांच्या अरेरावीला बसणार आळा; थेट व्हॉट्सअॅपवर तक्रार करा आणि मिळवा बक्षीस, जाणून घ्या सविस्तर
PMPML Bus | (File Image)

पुण्यात (Pune) बस चालक आणि वाहकांची अरेरावी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अनेक नागरिकांनी याबाबत तक्रार केली आहे. आता पुणे महानगर परिवहन महामंडळ प्रायव्हेट लिमिटेड (PMPML) ने पीएमपीएमएलचे चालक आणि वाहकांच्या उद्धट वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक योजना जाहीर केली आहे. अशा वाहनचालकांबाबत तक्रार करणाऱ्या नागरिकांना 100 रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. मात्र ती मिळविण्यासाठी नागरिकांना चालक व वाहकांचे गैरव्यवहार सिद्ध करावे लागतील.

पीएमपीएमएलने एका निवेदनात स्पष्ट केले आहे की, जे चालक वाहन चालवताना मोबाईलवर बोलतात त्यांचाही या योजनेत विचार करण्यात आला आहे. कारण त्यांचे वर्तन हे प्रवाशांसाठी असुरक्षित आहे. मार्ग फलक नसणे किंवा चुकीचे मार्गाचे फलक, झेब्रा क्रॉसिंगवर बस थांबवणे हे देखील दंडनीय असेल. यासाठी चालक किंवा कंडक्टरला 1000 रुपये दंड आकारला जाईल.

निवेदनात पुढे नमूद केले आहे की, ‘अशा तक्रारी प्राप्त झाल्यावर नागरिकांना 100रु.चे बक्षीस दिले जाईल. तसेच ड्रायव्हर किंवा बस कंडक्टरला 1000 रुपये दंड आकारला जाईल, जो त्यांच्या पगारातून कापला जाईल.’ तक्रार करण्यासाठी, नागरिक पुराव्याचा एक भाग म्हणून फोटो क्लिक करू शकतात आणि तक्रारी  @ppml.org वर किंवा व्हॉट्सअॅप क्रमांक 9881495589 वर पाठवू शकतात. तक्रारीमध्ये बस क्रमांक, मार्ग, ठिकाण, तारीख आणि घटनेची वेळ यासारखे तपशील नमूद करावेत. तक्रारीचा पुरावा जवळच्या बस डेपोतही सादर करता येईल. (हेही वाचा: RTOs Launched A WhatsApp Service: खुशखबर प्रवाशांच्या सुरक्षितेत वाढ, रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या चालकांविरोधात व्हॉट्सअॅप द्वारे करा तक्रार)

दरम्यान, राज्य परिवहन विभागाने खासगी बसचालकांविरुद्ध राबविलेल्या विशेष मोहिमेत संपूर्ण महाराष्ट्रात 4,277 बस नियमांचे उल्लंघन करताना आढळून आल्या. यापैकी 514 बसेस योग्य अग्निशमन यंत्रणेशिवाय धावत असल्याचे आढळून आले आणि 890  चालक योग्य परवान्याशिवाय वाहन चालवताना किंवा परवान्यांच्या अटींचे उल्लंघन करताना आढळून आले. एकूण 183 लाख रुपयांचा दंड या गुन्हेगारांवर लावण्यात आला.