पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) हजारो कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. महापालिका आयुक्तांनी हे आदेश दिले आहेत. नुकताच पुणे महापालिकेत 1 मे रोजी महाराष्ट्र राज्य निर्मिती दिनाचा सोहळा पार पडला. यावेळी ध्वजारोहनाच्या कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी महापालिकेच्या मुख्य इमारती मधील सुमारे 2,500 कर्मचाऱ्यांना उपस्थित राहणे बंधनकारक होते, मात्र यावेळी अवघे 200 कर्मचारीच उपस्थित राहिले. त्यानंतर आता महापालिका आयुक्तांनी अनुपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, 1 मे रोजीच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याबाबत महापालिकेने कर्मचाऱ्यांना आदेश जारी केले होते. त्यामध्ये स्पष्ट केले होते की, महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य वर्धापन दिनानिमित्त आयोजित राष्ट्रध्वज वंदन व संचलन कार्यक्रमासाठी पुणे महापालिकेतील सर्व अधिकारी व सेवकांनी उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
यासह सर्व खातेप्रमुखांनी आपल्या नियंत्रणाखालील सर्व विभाग व उप विभागातील कर्मचाऱ्यांना ध्वजारोहण कार्यक्रमाच्या अगोदर किमान 10 मिनिटे महापालिका प्रांगणात उपस्थित राहण्यास सांगावे असेही नमूद केले होते. जर कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या प्रांगणात उपस्थित राहणे शक्य नसेल तर, त्यांनी नजिकच्या शासकीय अथवा सार्वजनिक ठिकाणी ध्वजारोहण समारंभास उपस्थित राहण्याचीही मुभा देण्यात आली होती. (हेही वाचा: Karnataka Assembly Election 2023: ... तर मराठी भाषिकांनी ' जय भवानी जय शिवाजी' म्हणून मतदान करा; उद्धव ठाकरेंनी सुनावले)
खाते प्रमुखांना उपस्थित कर्मचाऱ्यांची उपस्थिती घेऊन त्याचा अहवाल कामगार कल्याण विभागाकडे सादर करायचा होता. असा आदेश जारी करून, सुचना देऊनही महापालिकेतील जवळजवळ 2,500 कर्मचारी कार्यक्रमास अनुपस्थित राहिले. आता आयुक्तांनी अशा कर्मचाऱ्यांच्याविरुद्ध कारवाईचा आदेश दिला आहे.