निसर्ग चक्रीवादाळाने (Nisarga Cyclone) महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक भागात धुमाकूळ घातला होता. मात्र, निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका रायगड जिल्ह्यातील (Raigad) नागरिकांना बसला आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे 2 दिवसांत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मुख्यमंत्र्यांनी घेतल्या. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगर विकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब हे देखील सहभागी झाले होते.
निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे दोन दिवसांत सादर करावेत म्हणजे शेतकरी व गावकऱ्यांना तातडीने मदत करता येईल. विशेषत: रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विजेचे खांब पडले असून महावितरणने तातडीने वीज पुरवठा सुरु करावा व प्रसंगी त्यासाठी इतर ठिकाणाहून जास्तीचे मनुष्यबळ , साधन सामुग्री उपलब्ध करावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे म्हणाले की, रायगड जिल्ह्यात मध्ये घरांचे जे नुकसान झाले आहे, त्यांच्याकडे स्वयंपाक पाण्याची सोय नाही. त्यांना तातडीने अन्न धान्य पोहचविणे गरजेचे आहे. यंत्रणेने ते काम लगेच हाती घ्यावे. महावितरणाने अधिकचे मनुष्यबळ या भागात लावून वीज पुरवठा पहिल्यांदा सुरु करावा. रुग्णालये, दवाखाने यांना वीज पुरवठा सुरु राहणे गरजेचे आहे. नुकसान भरपाई देतांना नागरिकांना विश्वासात घ्या. संकट मोठे आहे, आपण सर्व कोरोनामध्ये दिवस रात्र काम करीत आहात त्याचे निश्चितच कौतुक आहे. मुंबई परिसरातील छावण्यांमध्ये हलविलेल्या नागरिकांना सोडतांना त्यांची कोरोना चाचणी करून घ्यावी, असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. हे देखील वाचा- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र; राज्यातील मृतांच्या वाढत्या संख्येवर केली चिंता व्यक्त
पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक अहमदनगर, कोकण विभागीय आयुक्त या बैठकीस उपस्थित होते. आपल्या नशिबामुळे या चक्रीवादळाचा जोर ओसरला. आपल्याला आता सदैव दक्षता घ्यावी लागेल. महत्वाचा मुद्दा असा की पूर्व किनाऱ्यावर अशी वादळे नवीन नाहीत पण आता पश्चिम किनाऱ्यावर मुंबईला पहिल्यांदाच खूप वर्षांनी असे वादळ आले. त्यामुळे आपल्याला भविष्यातील तयारीही ठेवावी लागेल, असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.