गेल्या अनेक महिन्यांपासून, आरक्षणाच्या मुद्द्यासह आपल्या इतर मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा (Maratha Kranti Morcha)चे आंदोलन सुरु आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्हीही निवडणुक लढवू, अशी भूमिका मराठा मोर्चाने घेतली होती. त्यानुसार लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवार यादीही जाहीर करण्यात आली. मात्र आता निवडणुकीला काही दिवस शिल्लक असताना महाराष्ट्र क्रांती सेनेने निवडणूक न लढवण्याचे जाहीर केले आहे. सोबत भाजप-शिवसेनेला थेट पाठींबा दिला आहे, शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेतला गेला.
The willingness to work for the betterment of the nation transcends ideological differences and brings individuals together. Honoured to welcome Maharashtra Kranti Sena and their support to the ‘Maha Yuti’, strengthening the belief of ‘#PhirEKBaarModiSarkar’ pic.twitter.com/TPaWVOVatz
— Chowkidar Vinod Tawde (@TawdeVinod) April 7, 2019
मागच्या वर्षी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सुरेश पाटील यांनी ‘महाराष्ट्र क्रांती सेना’ या पक्षाची स्थापना केली होती. त्यानुसार एकूण 15 उमेदवार महाराष्ट्र क्रांती सेनेने लोकसभा निवडणुकीसाठी उभे केले होते. त्यातील 9 उमेदवारांनी उमेदवारी अर्जदेखील भरले होते. आता यातील सर्व उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. (हेही वाचा: मागण्या मान्य न झाल्याने अखेर 'मराठा क्रांती मोर्चा'कडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर)
मराठा क्रांती मोर्चाने अनेक मागण्या मांडल्या होत्या, मात्र सरकारने आतापर्यंत फक्त आश्वासनेच दिली. यावर चिडलेल्या मोर्चेकऱ्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा पवित्रा घेतला होता. त्यांचा लढा सध्याचे असलेले भाजप सरकारविरुद्ध होता. मात्र आता अचानक मराठा क्रांती सेनेने भाजप-शिवसेना यांना पाठींबा जाहीर केला आहे. महायुतीमध्ये घटकपक्ष म्हणून सहभागी होण्याचे पत्र या पक्षाने चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेला दिले आहे.
याबाबत बोलताना सुरेश पाटील म्हणाले, ‘आम्हाला आमच्या आरक्षणासाठी मदत करणाऱ्या सरकारला आम्ही पाठिंबा दिला आहे. आमच्या समाजाच्या ज्या काही मागण्या असतील त्याला न्याय देण्याचे शिवसेना- भाजपाने आश्वासन दिले आहे’.