मागण्या मान्य न झाल्याने अखेर 'मराठा क्रांती मोर्चा'कडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

गेल्या अनेक महिन्यांपासून, आरक्षणाच्या मुद्द्यासह आपल्या इतर मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा (Maratha Kranti Morcha)चे आंदोलन सुरु आहे. मात्र या मागण्यांवर सरकारने अद्याप काही ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर, आम्हीही निवडणुक लढवू अशी भूमिका मराठा मोर्चाने घेतली आहे. आज मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती देण्यात आली. याचसोबत निवडणुकांसाठी पहिल्या टप्प्यातील उमेदवार यादीही जाहीर करण्यात आली.

पहिल्या टप्प्यात मुंबई आणि ठाणे येथील हे अपक्ष उमेदवार आहेत

स्नेहा रविंद्र कुऱ्हाडे – ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ

विनोद पोखरकर- ठाणे लोकसभा मतदारसंघ

सुहास बागल- उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ

आपल्या मागण्यांबाबत आपण लेखी पत्र व्यवहार केला होता, मात्र सरकारकडून याची दखल घेतली नाही. म्हणून आम्हीही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती विनोद पोखरकर यांनी दिली. (हेही वाचा: 'भाजप'ची पहिली उमेदवार यादी जाहीर; महाराष्ट्रात या लोकांना मिळाली उमेदवारी)

मराठा मोर्चाच्या काही मुख्य मागण्या –

> आंदोलनादरम्यान आत्मबलिदान केलेल्या बांधवांच्या कुटुंबाला आर्थिक मदत आणि एकाला शासकीय नोकरी

> मराठा युवकांवर लावण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत

> मराठा समाजातील युवकांना रोजगार प्रशिक्षण

> राज्यातील महत्वाच्या शहरांमध्ये मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधावे

> संपूर्ण मराठा शेतकऱ्यांची कर्जमाफी

इत्यादी अनेक मागण्या मराठा मोर्चाद्वारे सरकारसमोर मांडण्यात आल्या आहेत. मात्र सरकारने आतापर्यंत फक्त आश्वासनेच दिली. यावर चिडलेल्या मोर्चेकऱ्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा पवित्रा घेतला आहे.